वितरणप्रणालीतील ९६ टक्के पाणी पिण्यायोग्य; टाक्यांमधील ८१ टक्के पाणी पिण्यायोग्य

नीलेश पानमंद, ठाणे</strong>

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या वितरणप्रणालीतील पाणी ९६ टक्के तर साठवणुकीसाठी असलेल्या टाक्यांमधील पाणी ८१ टक्के पिण्यायोग्य असल्याची बाब पर्यावरण अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षी वितरणप्रणालीतील पाणी ९३ टक्के तर टाक्यांमधील पाणी ७८ टक्के पिण्यायोग्य होते. त्या गुणवत्तेमध्ये यंदा तीन टक्क्यांनी वाढ झाली असून यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचे स्पष्ट होत आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामामुळे ही गुणवत्ता सुधारल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले असून शहराची लोकसंख्या अंदाजे २३ लाखांच्या घरात गेली आहे. या लोकसंख्येसाठी महापालिकेकडून दररोज शहरात ४८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी मुंबई महापालिकेकडून ६५ दशलक्ष लिटर इतके पाणी कोणत्याही प्रक्रियेविनाच दिले जात होते. या पाण्याचे वितरण किसननगर, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, रामचंद्रनगर, लुईसवाडी, काजूवाडी, नळपाडा, बाळकुम आणि नामदेववाडी या भागात केले जाते. या भागात कोणत्याही प्रक्रियेविनाच पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे येथील नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होत होता. याबाबत सातत्याने महापालिकेकडे तक्रारी येत होत्या.

या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने मुंबई महापालिकेकडून प्रक्रिया केलेले पाणी घेण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी जलवाहिन्यांच्या जोडणीची कामे केली. त्यामुळे या भागात आता

शुद्ध पाणीपुरवठा होत आहे. असे असतानाच आता संपूर्ण शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या वितरणप्रणालीतील आणि साठवणुकीसाठी असलेल्या टाक्यांमधील पाण्याच्या गुणवत्तेत तीन टक्क्यांनी सुधारणा झाल्याची बाब समोर आली आहे.

जलकुभांची रोबोटिक सफाई

ठाणे महापालिकेने टेमघर परिसरात २८० दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेचे जलप्रक्रिया केंद्र उभारले आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी ७५० किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्या वाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच शहरात पाणी साठवणुकीसाठी ६० जलकुंभ आहेत. या जलकुंभाची रोबोटिक यंत्राद्वारे गेल्या काही वर्षांपासून साफसफाई करण्यात येते.

पाण्याचे १०६९६ नुमुने

* प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत विविध ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पाणी नमुने घेतले.

* या तपासणीत वितरणप्रणालीच्या पाण्याचे १०६९६ नुमन्यांपैकी ९६ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले. तर चार टक्के पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले.

* तसेच साठवणुकीच्या टाक्यांमधील पाण्याचे १७५०९ नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ८१ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य तर १९ टक्के पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले.

वितरण पाणी गुणवत्ता

वर्ष               गुणवत्ता 

२०१६-१७       ९१ टक्के

२०१७-१८       ९३ टक्के

२०१८-१९       ९६ टक्के

साठवणूक पाणी गुणवत्ता

वर्ष               गुणवत्ता

२०१६-१७       ७१ टक्के

२०१७-१८       ७८ टक्के

२०१८-१९       ८१ टक्के