कल्याण पश्चिमेत सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहन उभं केल्याच्या रागातून दोन जणांनी एका मोटार चालकाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्यावर वाहन उभं करायचं असेल तर प्रत्येक फेरीला ५०० रूपये खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी करत दोघांनी ही मारहाण केली आहे. अशाप्रकारे वाहन चालकांकडून खंडणी उकळून त्रास देण्याचा हा प्रकार नेहमीचाच असल्याने वाहन चालकाने दोघाजणांविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सचिन अशोक घुगे (३६, रा. घुगे सदन, ठाणकरपाडा, कल्याण पश्चिम) आणि अशोक साबळे अशी आरोपींची नावं आहेत. तर इरफान सय्यद (५२, रा. संगमनेर, जि. पुणे) असं फिर्यादीचं नाव आहे. चालक इरफान हे आपल्या मोटारीनं संगमनेर येथून मालकाचे नातेवाईक राहुल कदम व त्यांची पत्नी निकिता यांना घेऊन कल्याणमधील विकास हॉटेल भागात आले होते. राहुल कदम यांना घरी सोडल्यावर वाहन चालक इरफान यांनी विश्रांतीसाठी मोटार विकास हॉटेल समोरील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उभी केली.

दरम्यान, इरफान मोटारी बाहेर उभे असताना, त्याठिकाणी आरोपी सचिन घुगे आणि अशोक साबळे आले. त्यांनी इरफानला ‘तुला येथे वाहन उभं करण्यास कोणी सांगितलं. ही वाहन उभं करण्याची जागा नाही’, असं बोलत लोखंडी सळईने मारहाण करायला सुरुवात केली. या हल्ल्यात इरफान जखमी झाले. या रस्त्यावर मोटार उभी करायची असेल, तर प्रत्येक फेरीला ५०० रूपये खंडणी द्यावी लागेल, असं आरोपींनी इरफानला धमकावलं. त्यानंतरही दोघांनी इरफानला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली.

यापूर्वीही आरोपी सचिन आणि अशोक यांनी विकास हॉटेल परिसरात रस्त्यावर वाहन उभं करणाऱ्या सुमित कटाळे यांना दमदाटी करत मारहाण केली होती. तसेच वाहन उभं केल्याच्या कारणातून ३०० ते ५०० रुपयांची खंडणी वसूल केली होती. यानंतर आता इरफान यांनी दोन्ही आरोपींविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी सचिन आणि अशोक यांच्याविरोधात मारहाण, दमदाटी आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वाय. बी. चव्हाण करत आहेत.