वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांशी वाद; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कारवाई

उल्हासनगर : उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. संततधार पावसाची त्यात भर असल्याने आधीच खडतर झालेल्या प्रवासात वाहतूक पोलिसांच्या तपासणीच्या जाचाला वाहनचालकांना सामोरे जावे लागते आहे. खराब रस्त्यांमध्ये संतप्त वाहनचालक आणि वाहतूक पोलीस यांच्या या तपासणीमुळे खटके उडू लागले आहेत. विशेष म्हणजे उल्हासनगर आणि अंबरनाथ विभागात वाहतूक विभागात वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि साहायक पोलीस आयुक्त ही दोन्ही पदे रिक्त आहेत.

उल्हासनगर शहरात सर्वच रस्त्यांना कमी अधिक प्रमाणात खड्डय़ांनी ग्रासले आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. कॅम्प एक, दोन, कॅम्प तीन या सर्वाधिक वर्दळीच्या भागातील बाजारपेठांमधील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे येणारे ग्राहक आणि वाहनचालकांना आधीच मोठी कसरत करावी लागते. अंबरनाथ तसेच कॅम्प चार आणि पाच भागाला जोडणाऱ्या फॉरवर लाइन चौकापर्यंत पोहोचण्यासाठी कॅम्प दोन भागातून येणारा मध्यवर्ती रुग्णालय रस्ता, कल्याण बदलापूर रस्ता यांची दुरवस्था झाली आहे.

साचलेल्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व त्रासातून बाहेर येणाऱ्या वाहनचालकाला फॉरवर लाइन चौकात वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या जाचाला सामोरे जावे लागते आहे. वाहतूक नियंत्रणाच्या कामी घेतलेल्या वाहतूक सहायक अर्थात ट्राफिक वार्डन यांच्याकडून वाहनचालकांना बेकायदा पद्धतीने रोखले जाते आहे. तर अनेकदा दंड आकारणीही याच साहाय्यकांकडून केली जात असल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलीस या साहाय्यकांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोप आता वाहनचालक करत आहेत.

आधीच खड्डे, त्यात संततधार पाऊस, त्यात मार्गक्रमण करताना असंख्य अडचणी असताना हा तपासणीचा जाच वाहनचालकांचा पारा चढवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांत खटके उडताना दिसत आहेत.

तीन पदे रिक्त

वाहतूक पोलीस विभागातील उल्हासनगर आणि अंबरनाथ – बदलापूर या दोन विभागातील पोलीस निरीक्षकांच्या बदली झाल्यानंतर महिना उलटूनही या विभागांना नवे निरीक्षक मिळालेले नाहीत. त्यातच काही दिवसांपूर्वी या विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पदाच्या अधिकाऱ्याचीही बदली झाली आहे. त्यामुळे तीनही शहरातील वाहतूक विभागाचा कारभार कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने चालत असल्याची कुजबुज आहे.

बदलापुरातही वाहनचालकांचा संताप

दोनच दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिम स्थानक परिसरात एका वाहतूक साहाय्यकाने चुकीच्या पद्धतीने दंड वसूल केल्याचे प्रकरण समोर आले. एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने याबाबत वाहतूक पोलीस आणि वाहतूक सहायकाला जाब विचारला. याबाबतची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करण्यापेक्षा तपासणीतच अधिक रस दाखवत असल्याचे दिसून आले आहे.