अंमली पदार्थ तस्करीतील गु्न्ह्यात बाजारपेठ पोलिसांना हवा असलेला आरोपी जेठालाल हिमताराम चौधरी याला पोलिसांनी पत्रीपुलाजवळील बाजार समितीच्या परिसरातून शिताफीने अटक केली. दोन वर्षापासून पोलीस जेठालालच्या मागावर होते. गु्न्हा केल्यानंतर आपण जेठालाल आहे हे कोणास ओळखू येऊ नये म्हणून जेठालाल अंधांचा काळा चष्मा लावून फिरत होता. तो जन्मजात एका डोळ्याने अंध आहे, असे पोलिसांनी सांगितले. जेठालाल कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ गावातील गुरुदेव ट्रेडर्स हीम गंगा सोसायटी येथील निवासी आहे.

फरार जेठालाल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवार परिसरात येणार आहे, अशी माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन साळवी यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना ही माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शोध शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक के. पी. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बाजार समिती परिसरात सापळा लावला.

सोमवारी ठरल्या वेळेत जेठालाल बाजार समिती भागात आला. तो संशयास्पद फिरत असताना एका साध्या वेशातील पोलिसाने त्याला हटकले. त्याने त्याकडे दुर्लक्ष करून या भागात पोलीस असल्याचा संशय येऊन तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. चारही बाजुने पोलिसांनी त्याला घेरल्याने त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. तो अलगत पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. यापूर्वीच्या आणि गेल्या दोन वर्षात त्याने किती तस्करी केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत.