scorecardresearch

ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ कोटी ७२ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

ठाणे जिल्ह्यात २०२२ मध्ये वर्षभरात २ कोटी ७२ लाख ४८ हजार २३३ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ६८८ जणांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

druge crime
नगरमधील एकाकडून २४ लाखांचे अमली पदार्थ जप्त

ठाणे जिल्ह्यात २०२२ मध्ये वर्षभरात २ कोटी ७२ लाख ४८ हजार २३३ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ६८८ जणांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. अंमली पदार्थाचे सेवन व वापर यांच्या संदर्भात परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक अशोक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, जिल्हा शासकीय विभागाचे डाॅक्टर, पोलीस उपस्थित होते.

हेही वाचा >>>ठाण्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत रंगला श्रेयवाद, दिवा कचराभुमी बंद करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दोघांचा दावा

ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध भागात कारवाई केली. यावेळी पोलिसांनी गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रॉन, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नशेच्या गोळ्या, कफ सिरफ, हेरॉईन, अफिम, केटामाइन आणि मॅथेक्युलिन असे एकूण २ कोटी ७२ लाख ४८ हजार २३३ रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले, असे मोराळे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच आयुक्तालय हद्दीत अमली पदार्थांचे सेवन, विक्री व हाताळणीला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांसह विविध विभागाने सक्रीय राहावे. घरपोच येणाऱ्या वस्तू, टपालामार्फत येणाऱ्या वस्तू, बंद पडलेले कारखाने, गोडाऊन, निर्जन जागा अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सूचना मोराळे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक कैलास खापेकर, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर जावळे, राज्य उत्पादन शुल्क ठाण्याचे राजेंद्र शिरसाट, शहर पोलीस दलातील अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 18:48 IST