सुक्या मासळीला महागाईचा फटका

ताजे मासे हे खवय्यांचे खास आकर्षण असले तरी सुकी मच्छी वर्षभर खवय्यांची रसिका तृप्त करत असते.

वाळू उपशामुळे मासे सुकवण्याच्या पारंपरिक जागा नष्ट

मत्स्यदुष्काळामुळे ताज्या मासळीची आवक घटली असतानाच आता सुक्या मच्छीचे प्रमाणही कमालीचे कमी झाले आहे. अवैध वाळू उपशामुळे किनारे खचू लागले असून मच्छी सुकवण्याच्या पारंपरिक आणि नैसर्गिक जागाही नष्ट होऊ लागल्या आहेत. याचा परिणाम या मोसमात जाणवू लागला असून सुकी मासळी महागली आहे. तब्बल १५ ते २० टक्क्यांनी त्यांच्या किमती वाढू लागल्या आहेत. आधी किलोने मिळणारी सुकी मासळी आता वाटय़ाने मिळू लागली आहे.

ताजे मासे हे खवय्यांचे खास आकर्षण असले तरी सुकी मच्छी वर्षभर खवय्यांची रसिका तृप्त करत असते. पावसाळ्यात मासे बंद असताना उत्तम पर्याय म्हणून सुक्या मच्छीचा वापर होतो. विविध कारणांमुळे ओल्या आणि ताज्या मासळींचा दुष्काळ भेडसावत असताना आता सुक्या मच्छीचाही तुटवडा जाणवू लागला आहे. मुळात जात्या माशांची आवक कमी असताना सुक्या मच्छीची प्रक्रिया कमी झाली होती, परंतु वसईतील मच्छीमारांना मासे सुकवण्यासाठी जागेची मोठी समस्या निर्माण होऊ  लागली आहे. किनाऱ्यावर पारंपरिक पद्धतीने मासे सुकवले जात असतात. परंतु वसईतील वाळूमाफियांच्या अवैध रेती उत्खननाने किनारे खचू लागले आहेत आणि पारंपरिका जागाही नष्ट होऊ लागल्या आहेत. वसईच्या मच्छीमारांना ही मोठी समस्या भेडसावत असल्याचे ‘कोळी युवा शक्ती’ने सांगितले.

मच्छी सुकण्यासाठी मोठी जागा लागते. पूर्वापार किनाऱ्यावर मच्छीमार महिला मासे सुकवत असतात, परंतु वाळुमाफियांनी अवैधपणे वाळू उत्खनन केल्याने किनारे खचू लागले आहेत. वाळुमाफिया सक्शन पंप लावून किनाऱ्यालगतचा वाळुउपसा करत असतात. त्यामुळे हळूहळू किनारे कमी होत चालले होते. त्याचा दुष्परिणाम आता दिसू लागला असल्याचे कोळी युवाशक्तीच्या दिलीप माठक यांनी सांगितले. सर्वात जास्त समस्या वसईतील मच्छीमारांना भेडसावत आहे. विरारमधील अर्नाळा तसेच भाईंदरमधील उत्तन, डोंगरी येथील मच्छीमारांकडे मच्छी सुकवण्यासाठी जागा शिल्लक आहे. उत्तन, डोंगरी येथील भाग दगडाळ असल्याने तो सुरक्षित राहिलेला आहे.

१५ ते २० टक्क्यांनी महाग

ताजे मासे नसल्यानेच सुक्या मासळीची कमरता जाणवत आहे. हिवाळ्यात सुकवलेल्या मच्छीचा दर्जा हा खूपच चांगला असतो. मांदेली, बोंबील, सुकट , जवळा, वाकटी, पाखट, बांगडा, घोळीचा खारा आदी सुकी मासळी बाजारात येऊ  लागली आहे. पण त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जी सुकी मच्छी आली आहे, त्याच्या किमती मागील वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्कय़ांनी वाढल्या आहेत. मागील वर्षी दीडशेने घेतलेल्या बोंबिलांसाठी दोनशे ते अडीचशे रुपये शेकडा मोजावे लागत आहेत,  तसेच इतर सुक्या मच्छीचा भाव हा मागील वर्षीच्या तुलनेत १५ ते २५ टक्के वाढला आहे. यामुळे मत्स्यप्रेमी खव्य्यांना आर्थिक फटका बसत आहे.

आठवडी बाजारात दुष्काळ

वसईच्या आठवडी बाजारात सुकी मच्छी प्रमुख आकर्षण असते, परंतु आठवडी बाजारातही सुक्या मच्छीचा तुटवडा जाणवत आहे. दर सोमवारी विरारच्या खानिवडेला, बुधवारी शिरवलीला, गुरुवारी मांडवीला तर शुक्रवारी सातिवली आणि पापडी येथे आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारात सुकी मच्छी आली असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आम्ही वर्षभरासाठी बोंबील भरून ठेवत असतो, मात्र आता त्याच्या किमतीही वाढल्याचे मांडवी बाजारात नियमित येणाऱ्या अलका पाटील या महिलेने सांगितले.

या मोसमात आम्हाला सर्वाधिक माशांच्या दुष्काळ जाणवतो आहे. मच्छिमार कर्जबाजारी झाले आहेत. बाजारात जे मासे येतात, ते महाग आहेत.

जॉन्सर सौदिया, मच्छीमार, पाचूबंदर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dry fish price hike

ताज्या बातम्या