अंबरनाथ : अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगररचना पदावर अधिकारी मिळत नसल्याने या विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे शहर नियोजनाचा खेळखंडोबा झाला असून विविध बांधकाम परवानग्यांची कामे रखडल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. शेजारच्या उल्हासनगर शहरातही नगररचना सहायक संचालक अवघ्या ६ दिवसांसाठी मिळाले. त्यापूर्वी इथेही प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभाराची भिस्त होती.
अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन शहरे झपाट्याने विकसीत होत आहेत. परवडणारी घरे, निसर्गरम्य वातावरण आणि नोकरदार वर्गाची मोठी संख्या या मुळे या दोन शहरात राहण्याला पसंती दिली जाते. गेल्या काही वर्षात नोकरदार वर्गासह मुंबईच्या गर्दीतून शांततेत जीवन व्यतीत करण्यासाठी या दोन शहरांमध्ये घरे घेतली जातात. त्यामुळे परवडणाऱ्या घरांसोबतच या दोन्ही शहरात सुसज्ज सुविधांसह लाखो रूपयांची घरेही उपलब्ध झालेली आहेत. अंबरनाथसारख्या शहरात तर पुनर्विकासाला वेग मिळाला आहे. सुर्योदय सोसायटीसह विविध भागात अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. काही प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक नव्या घरांचे काम पूर्ण झाले असून त्यांना पुर्णत्वाचा दाखला आवश्यक आहे. अशा अनेक कामांसाठी पालिकांच्या नगररचना विभागावर अवलंबून राहावे लागले.
पालिकांना सर्वाधिक उत्पन्न देणारा विभाग म्हणूनही या विभागालाकडे पाहिले जाते. मात्र या विभागाला पात्र अधिकारीच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या नगरपालिकांमध्ये नगर रचनाकार उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे नगर ररचनाकार विवेक गौतम हे एप्रिल महिन्यात निवृत्त झाले. तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे नगर रचनाकार प्रकाश मुळे हेसुद्धा काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यांच्या जागी नव्या नगर रचनाकाराची निवड होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप दोन्ही नगरपालिकांमध्ये नगर रचनाकाराची नेमणुक झालेली नाही. त्यामुळे दोन्ही शहरांच्या या पदावर प्रभारी अधिकारी नेमण्यात आला आहे.
शहरराबाहरेच्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी दिल्याने हे अधिकारी पुरेसा वेळ देत नसल्याची बांधकाम व्यावसायिकांची तक्रार आहे. त्यामुळे बांधकाम, इमारतींचा पूर्णत्वासह इतर दाखले, परवानग्या यांसाठी प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे या पदांवर पात्र अधिकाऱ्यांची वर्णी वेळेत लावावी अशी मागणी होते आहे.
उल्हासनगरात ६ दिवसांची नियुक्ती
उल्हासनगरच्या सहायक संचालक नगर रचनाकार म्हणून सहा दिवसांपूर्वी राजेंद्र हेले यांची नियुक्ती झाली. विशेष म्हणजे हेले हे ३० जून रोजी निवृत्त झाले. त्यापूर्वी सहायक आयुक्तांची या पदावर प्रभारी म्हणून नियुक्ती झाली होती. आता पुन्हा प्रभारी अधिकारी नेमला जाण्याची शक्यता आहे. उल्हासनगर शहरात पुनर्विकासाच्या प्रकल्पांना गती देण्याची गरज आहे. असे असताना त्या पदावर पात्र अधिकारीच मिळत नसल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
प्रतिक्रिया
दोन्ही पालिकांमध्ये नगररचनाकार हे पद रिक्त आहे. त्यामुळे अनेक कामे रखडलेली आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांकडून वेळ दिला जात नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती होण्याची गरज आहे. – ज्ञानधर मिश्रा, सचिव, अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशन.