मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील खड्डयांमुळे नेहमीप्रमाणे गुरुवारी कल्याण-शीळफाटा रस्त्यावर वाहन कोंडी झाली होती. खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने चालविली जातात, त्यामुळे या रस्त्यावर वाहन कोंडी होत आहे, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. अवजड वाहने रात्रीच्या वेळेत या खड्ड्यांवरून गेली की दिवसा बुजविलेले खड्डे दोन दिवसांनी पुन्हा आहे त्या स्थितीला येतात. चौकांचौकांमध्ये वाहने वळण घेताना रस्ता अधिक घासला जातो. त्यामुळे चौकांमधील खड्डे ही मोठी डोकेदुखी आहे. रस्ते देखभाल यंत्रणा या रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष देत नाही. शीळफाटा रस्त्यावरील काटई नाका येथील टोलनाका भागात रस्ता डांबरीकरणाचा आहे. या ठिकाणी सर्वाधिक खड्डे पडले आहेत. टोलनाक्या लगत निळजे पूल आहे. पुलावरून येणारी आणि जाणारी वाहने एकाचवेळी खड्ड्यांच्या भागात संथगती होत असल्याने पुलावरून येणारी वाहने पाठीमागे अडकून पडतात, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी दुपार पासून मानपाडा, काटई नाका, देसई चौक ते शीळफाटा दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे बदलापूर कडून येणारी वाहने काटई नाका ते बदलापूर रस्त्यावर खोळंबली होती. मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी ही वाहने रोखून धरली होती. काटई नाका ते शीळफाटा या दहा मिनिटाच्या रस्त्यासाठी एक ते दीड तास लागत होता, असे प्रवाशांनी सांगितले. ठाणे, कळवा, तुर्भे भागातून शीळफाटाकडे येणारी वाहने शीळफाटा चौक येण्यापूर्वीच वाहन कोंडीत अडकली होती. या कोंडीत दुचाकी स्वार मध्येमध्ये शिरकाव करत असल्याने कोंडीत आणखी भर पडली होती.

शीळफाटा ते मुंब्रा बाह्यवळण रस्ता दुपारपासून वाहन कोंडीत अडकला होता. त्याचा फटका शीळफाटा रस्त्याला बसला. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहने वर्दळीच्या रस्त्यांवरून सोडण्यास मनाई आहे. ही वाहने अनेक वेळा रस्त्याच्या बाजुला उभी करून ठेवली जातात. अशी वाहने अनेक ठिकाणी वाहन कोंडी करतात. अवजड वाहने दिवसा सोडली तर नोकरदार वर्गाच्या वाहनांना त्याचा फटका बसेल. त्यामुळे ही वाहने रात्रीच्या वेळेत सोडली जातात. अवजड वाहने रात्रीच्या वेळेत एकावेळी आल्याने इतर वाहनांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे दिवसा खड्ड्यांमुळे, रात्री अवजड वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने कोंडी वाढली आहे, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to potholes during the day and heavy vehicles entering the road at night the sheelphata road is in a traffic jam amy
First published on: 14-07-2022 at 20:02 IST