ठाणे महापालिका शाळांमध्ये आता ई-लर्निग क्लासरूम (वर्ग खोल्या) उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये ई-लर्निग क्लासरूम उभारणीचे काम हाती घेतले आहे. या शिक्षण पद्घतीमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास तसेच अभ्यासक्षमता, आकलनशक्ती, प्रश्न सोडविण्याचे कौशल्य यामध्ये विकास होणार आहे, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
व्होकार्ड फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून महापालिका शाळांमध्ये ई-लर्निग क्लासरूम उभारणीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून शिक्षण विभागाने तो स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. त्याला नुकतीच मान्यता देण्यात आली. या प्रस्तावानुसार शाळांमध्ये एकूण २४ संच पुरविण्यात येणार असून, त्यापैकी १२ संच व्होकार्ड फाऊंडेशन मोफत देणार आहे.
ई-लर्निग शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळे १०० अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध असून त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासक्षमता, आकलनशक्ती, प्रश्न सोडविण्याचे कौशल्य यामध्ये विकास होणार आहे. तसेच या शिक्षण पद्धतीमुळे माहितीचे दालन खुले होऊन भविष्यात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांना त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही पद्धत महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमावर अधारीत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम दृक्श्राव्य पद्धतीने शिकविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे. तसेच ही पद्धत शास्त्रोक्त असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करण्यास तसेच परीक्षेची भीती न बाळगता विद्यार्थी सहजपणे खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा देऊ शकतील, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.