scorecardresearch

किसननगरचा आधी पुनर्विकास

शहरातील झोपडय़ा, चाळी आणि बेकायदा इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासासाठी आखण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेच्या (क्लस्टर) अंमलबजावणीसाठी गुरुवारी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.

क्लस्टर योजनेसाठी सिडको आणि ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करार 

ठाणे : शहरातील झोपडय़ा, चाळी आणि बेकायदा इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासासाठी आखण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेच्या (क्लस्टर) अंमलबजावणीसाठी गुरुवारी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातील क्लस्टर योजनेसाठी ठाणे महापालिका आणि सिडको प्राधिकरणात सामंजस्य करार करण्यात आला. या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. याची सुरुवात किसननगर येथून करण्यात येणार आहे.

ठाण्यातील बेकायदा धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो नागरिकांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील लोकप्रतिनिधी संघर्ष करीत होते. यातूनच समूह पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला. या योजनेसाठी महापालिकेने एकूण ४४ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार केले आहेत. या योजनेचा पहिला टप्पा किसननगर भागात राबविण्यात येणार असून त्यासाठी पालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार हालचाली सुरू होत्या, परंतु या योजनेत काही त्रुटी असल्यामुळे तिची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नव्हती. नगरविकासमंत्री पद शिंदे यांच्याकडे येताच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील ही योजना वेगाने मार्गी लागावी यासाठी या योजनेतील त्रुटी वेगाने दूर करण्यात आल्या.

एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात

ठाणे महापालिका क्षेत्रात वागळे इस्टेट परिसरात गेल्या काही दशकांपासून शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत या भागातून ३४ पैकी ३० नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. पालकमंत्री शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भाग याच परिसरात मोडतो. त्यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वी क्लस्टरचा महत्त्वाचा टप्पा मार्गी लावण्याच्या जोरदार हालचाली शिवसेनेच्या गोटात सुरू होत्या. या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली असून त्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे पहिल्या टप्प्यात किसननगर येथील क्लस्टर योजनेला सुरुवात होणार आहे. सिडकोने या प्रकल्पासाठी वित्तीय सल्लागार म्हणून क्रिसिलची नियुक्ती केली असून आर्किटेक्चरल आणि मास्टर लेआऊट डिझाइन सल्लागाराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ठाण्यातील एकूण १५०० हेक्टरहून अधिक जमिनीवर क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून या योजनेत नागरिकांना स्वमालकीची घरे मिळण्याबरोबरच रुंद रस्ते, उद्याने, मैदाने, मूलभूत सोयीसुविधा, रोजगार केंद्रे, अर्बन फॉरेस्ट अशा सुविधा मिळणार आहेत.

गेली दोन दशके क्लस्टर योजनेसाठी जो प्रदीर्घ लढा दिला, त्याचा एक महत्त्वाचा यशस्वी टप्पा गुरुवारी पार पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात सिडको क्लस्टरची यशस्वी अंमलबजावणी करेल. या संपूर्ण परिसराचा नियोजनबद्ध विकास यामुळे होऊ शकेल. धोकादायक इमारतींमधून अधिकृत घरांमधील नागरिकांचा प्रवास उत्तम होऊ शकेल.

– एकनाथ शिंदे,  नगरविकासमंत्री, महाराष्ट्र

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Earlier redevelopment understanding cidco cluster scheme ysh

ताज्या बातम्या