scorecardresearch

ठाण्यात यंदा लवकर नालेसफाई; पुढच्या आठवडय़ात नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका क्षेत्रातील नाले पावसाळय़ात तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करत येत्या दोन ते तीन दिवसांत नालेसफाईची कामे सुरू करण्यात येणार आहे.

ठाणे : महापालिका क्षेत्रातील नाले पावसाळय़ात तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करत येत्या दोन ते तीन दिवसांत नालेसफाईची कामे सुरू करण्यात येणार आहे.
शहरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यंदा मात्र एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ातच म्हणजेच दरवर्षीपेक्षा १५ दिवस आधीच नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. तशा प्रकारचे नियोजन पालिकेच्या घनकचरा विभागाकडून आखण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेत ७ मार्चपासून पालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. महापालिकेचे प्रशासक म्हणून कामकाज पाहणारे आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दररोज शहरात दौरे करून स्वच्छता, सुशोभीकरण आणि विकासकामांचा आढावा घेत आहेत. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा शहरात दौरे करून विकासकामांचा आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री आणि आयुक्तांनी नालेसफाईची कामे लवकर सुरू करण्याचे निर्देश घनकचरा विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामाच्या निविदा काढल्या होत्या. या निविदा उघडण्यात आल्या असून त्यातील दर निश्चिती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून पुढील आठवडय़ात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्याची योजना घनकचरा विभागाने आखली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्य नाले आणि त्यास जोडणारे लहान-मोठे नाले असे एकूण ३०० किमी लांबीचे नाले आहेत. नालेसफाईचे काम हे कमी वेळेत व्हावे यासाठी नऊ प्रभाग समितीस्तरावर कामाचे विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या.
ज्या नाल्यात मोठय़ा प्रमाणात गाळ आहे, त्या नाल्याची सफाई पालटून यंत्राद्वारे केली जाणार आहे. यंदा विशेषत: पालटून यंत्राद्वारे नाल्यांची खाडीतील मुखे साफ केली जाणार आहेत. या कामावर पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नालेसफाईची कामांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच नालेसफाईची कामे ७ जून अखेपर्यंत शंभर टक्के पूर्ण केल्यानंतरही पावसाळय़ात नाल्यामधील वाहता कचरा काढण्याचे काम सप्टेंबर अखेपर्यंत केले जाणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. परंतु यंदा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील पाहणी दौऱ्यादरम्यान नालेसफाईची कामे लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, शहरात रोबोटिक यंत्राद्वारे नालेसफाईची कामे सुरूच आहेत. -मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Early sanitation work thane year sanitation work start week municipal corporation amy

ताज्या बातम्या