ठाणे : पूर्व द्रूतगती महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी वाहनांचा भार, उड्डाणपूलांवर पडलेले खड्डे यामुळे ठाण्यातील माजिवडा ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या १५ ते २० मिनीटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागत होता.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो खासगी तसेच सार्वजनिक वाहनांची वाहतूक होते. उपनगरीय रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी ठाणे, कल्याण आणि भिवंडी परिसरातील अनेक नोकरदार स्वतःच्या वाहनाने किंवा परिवहन सेवेच्या वाहतुकीच्या माध्यमातून मुंबईत ये-जा करतात. शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर वाहतुकीचा ताण वाढला असतानाच पावसामुळे वाहने संथगतीने धावू लागली.
त्यातच तीन हात नाका उड्डाणपुलावर झालेल्या किरकोळ अपघातामुळे वाहतूक आणखी विस्कळीत झाली. माजिवडा भागात उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी झाल्याने कोंडीत अधिक भर पडली. सुमारे १५ ते २० मिनिटांत पार होणारे मुलुंड टोलनाका ते माजिवडा हे अंतर वाहनचालकांना पार करण्यासाठी सुमारे पाऊण तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागत होता. त्यामुळे अनेक नोकरदारांना वेळेत घरी पोहोचता आले नाही. विशेषतः महिला प्रवाशांना या कोंडीचा मोठा फटका बसला. महामार्गालगतच्या बसथांब्यांवरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे बसगाड्याही वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना बसगाड्यांची प्रतीक्षा करावी लागली.
