ठाणे – नेतिवली येथील टेकडीवर असलेल्या क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गुंफेपर्यंत जाण्यासाठी सुकर आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून वयोवृद्ध नागरिकांनाही तेथे सहज जाता येईल. तसेच त्या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी निवृत्त कमांडर डॉ. सुनील कांबळे यांनी केली.

इतिहास संकलन समिती, कल्याण, श्रीराम सेवा मंडळ, डोंबिवली शहर इतिहास मंडळ, क्रीडाभारती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नेतिवली टेकडीवर हुतात्मा क्रांतीवीर वासुदेव फडके आणि त्यांचे शस्त्रगुरू लहुजी साळवे यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. यावेळी डॉ. कांबळे बोलत होते. या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी फडके यांची गुंफा प्रत्यक्ष पाहून इतिहास जाणून घेतला. पुढे ते म्हणाले, वासुदेव बळवंत फडके यांनी प्राथमिक शिक्षण घेत असतानाच इंग्रजी शिकण्याचे धाडस दाखवले. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. पुण्यात त्यांचा लहुजी वस्ताद यांच्याशी संपर्क आला.

मिलिटरी फायनान्समध्ये नोकरी करत असताना ब्रिटिश सत्तेचे अन्याय व अत्याचार त्यांनी जवळून अनुभवले. मातोश्री आजारी असतानाही व वर्षश्राद्धाच्या वेळीही सुट्टी नाकारली गेल्याने ब्रिटिश शासनाचा क्रूर चेहरा त्यांना दिसून आला. ब्रिटिश कार्यालयात काम करत असतानाही ब्रिटिशांविरुद्ध निर्भीडपणे मत मांडणारे ते एकमेव व्यक्तिमत्त्व होते. सशस्त्र क्रांतीशिवाय भारताच्या स्वातंत्र्यास पर्याय नाही, असा ठाम विचार त्यांनी मांडला.

भिल्ल, रामोशी यांसारख्या समविचारी लोकांना एकत्र करून त्यांनी क्रांतीची चळवळ उभी केली. याच काळात त्यांचा संपर्क लोकमान्य टिळक यांच्याशी आला. सरकारी नोकरीत असतानाच समाजकारण, राजकारण आणि समाजप्रबोधन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले. पुढे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या अजरामर कादंबरीसाठी फडके यांच्या जीवनकार्याचा आधार घेतला, असेही त्यांनी नमूद केले.

त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी म्हणाल्या की, वासुदेव बळवंत फडके यांचा पदस्पर्श नेतिवली परिसराला झाला असून त्यांनी येथील गुंफेत वास्तव्य केले. विद्यार्थ्यांना ही गुंफा दाखविण्याचा उद्देश म्हणजे क्रांतीकारक फडके येथे राहून गेले याची जाणीव नव्या पिढीला व्हावी. त्या काळी गावकरी त्यांना अन्न देत असत. गुंफेकडे जाण्यासाठी योग्य रस्ता असावा व ते स्थळ पवित्र स्मारक म्हणून विकसित करावे, यासाठी आपण पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.