राजकीय प्रवासाला अर्थविषयक जोड देण्यात कमी पडलेला, योग्य दिशेने, पण अपुऱ्या वेगाने धावणारा असा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. चांगले दिवस येतील; पण ते मी एकटा आणणार नाही. ते आणण्यासाठी आपल्या सगळ्यांचा मोलाचा सहभाग हवा आहे, असे सांगणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडला आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.  
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव आणि ‘सोहम गुंतवणूक संस्थे’च्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी टिळक बोलत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे, मेधा वैद्य उपस्थित होते.
ते म्हणाले की, दहावीच्या मुलाला ७५ टक्के गुण मिळाल्यानंतर या मुलाच्या पालकांना मुलाला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार असा प्रश्न पडतो. या काळात पालकांची जशी मन:स्थिती असते, तसाच काहीसा संभ्रम या अर्थसंकल्पाने उभा केला आहे. अन्नधान्याचे उत्पादन होत आहे, तरीही शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बँकेतील ठेवी वाढत आहेत, तरीही उद्योगांना कर्ज मिळत नाहीत. मूलभूत सुविधांचे आराखडे तयार आहेत, मात्र त्यांना परवानग्या नाहीत. देश योग्य दिशेने वाटचाल करीत आहे, तरीही यशाच्या मार्गात अडथळे आहेत. असे काहीसे वास्तव अर्थसंकल्पात मांडण्यात आले आहे.
सर्वच आघाडय़ांवर आक्रमकपणे पुढे चाललेल्या चीनची अर्थव्यवस्था नजरेसमोर ठेवून आपण सेवा क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे नजरा वळवल्या आहेत. उदारीकरणाच्या वाटेवरून जात असताना पदरात काय पडले, याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे; तसेच येणाऱ्या काळातील चीनची आर्थिक परिस्थिती आणि त्या तुलनेत भारत हा आर्थिक विचार मांडण्यात आला आहे. बँकांपेक्षा घराघरात पोहोचण्याचे साधन म्हणजे देशभरातील १७ लाख पोस्टमन. त्यामुळे टपाल कार्यालये, तेथील मनुष्यबळाचा सर्वतोपरी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी वापर करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. बँकांच्या संघटितपणामुळे टपाल विभागाला थेट बँक परवाना देण्यात आला नसला तरी गावपातळीवरचे पोस्टमन येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेतील एक घटक असतील हे अर्थसंकल्पाने दाखवून दिले आहे, असे टिळक यांनी सांगितले. मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप या परदेशातून आलेल्या सुविधांचा लाभ भारतीय घेतात. त्यामधून देशाच्या तिजोरीत कराच्या माध्यमातून एक छदाम पडत नाही. म्हणून परदेशी सुविधा देणाऱ्या सेवांवर कर लावण्यात आल्याने मोबाइल, लॅपटॉप महाग करण्यात आले आहेत, असे टिळक यांनी स्पष्ट केले.  
जयंत सिन्हांबद्दल आश्चर्य नको!
विकासाचे स्वप्न चोहोबाजूंनी दाखविले जात असताना मोदी यांची जी वाटचाल सुरू आहे त्या प्रमाणात अर्थसंकल्पाने त्यांना पुरेशी जोड दिली नाही. त्यामुळे पुढचा येणारा अर्थसंकल्प अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मांडला तर आश्चर्य वाटायला नको असे टिळक म्हणाले. अर्थव्यवस्थेशी ताळमेळ न राखणारे क्रांतिकारी निर्णय राजकीय परिस्थितीनुरूप घेतले नाही तर त्याची किंमत मोजावी लागते. आघाडी सरकारच्या काळात प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री असताना जे केले तेच अरुण जेटली यांनी केले आहे, अशी टिपणी करून राजकारण आणि अर्थकारणाची सांगड घालून केलेला प्रवास नेहमीच यशदायी असतो. ते पंतप्रधान राजीव गांधी, अर्थमंत्री व्ही. पी. सिंग, पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी आणि यशवंत सिन्हा या जोडगोळ्यांनी सिद्ध केले होते, असे टिळक म्हणाले.