ठाणे – मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवुन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवावर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. मात्र, ११ महिने प्रक्षिणार्थी म्हणून काम केल्यानंतर युवाशक्ती पुन्हा बेरोजगार झाली असून महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या विरोधात राज्यभरात आजवर १३ आंदोलने करण्यात आली, तरीही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या नेत्तृत्वाखाली ३६ जिल्हयातील हजारो सुशिक्षित प्रशिक्षणार्थी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात धडकले आहेत. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या युवाशक्तीने यल्गार करीत येत्या आठवड्याभरात ठोस निर्णय घेतला नाही तर, सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

राज्यात पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेपाठोपाठ युवावर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी (लाडका भाऊ) योजना राबवली. तसेच, १० लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतीमाह ६ हजार व १० हजार मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनामध्ये काम केलेले तब्बल १ लाख ७५ हजार प्रक्षिणार्थी आजघडीला प्रशिक्षित बेरोजगार बनले आहेत. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले असून लाडक्या बहिणीच्या भावाने अर्थात एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे आपल्या भाचा – भाचींना फसवल्याचा आरोप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील – चाकुरकर यांनी केला. त्यापार्श्वभूमीवर हजारो प्रशिक्षणार्थीनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पोहोचले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्तावर यासर्वांनी ठिय्या मांडला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

या आंदोलनात बेरोजगार प्रशिक्षणार्थी फलक झळकवुन घोषणाबाजी करत आहेत. प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार द्या, मानधनात दुप्पट वाढ करा तसेच, येत्या अधिवेशनात रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा करा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

दरम्यान, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष चाकूरकर यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसात यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

आंदोलनकर्त्यांचा सरकारला इशारा

जर या आंदोलनानंतरही सरकारने आश्वासन पाळले नाही. तर, आमची दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही येणारी दिवाळी साजरी करू देणार नाही. असा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेने सरकारला दिला आहे.