कल्याण : शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तीन शाळा अनधिकृत म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने घोषित केल्या आहेत. या तीन शाळा टिटवाळा भागात आहेत. या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.

मागील वर्षी अशाप्रकारच्या अनधिकृत शाळांची संख्या सहा होती. त्या शाळांनी शासनाच्या अटीशर्ती पूर्ण केल्याने त्या शाळांना परवानगी मिळाली आहे. अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या शाळांमध्ये येत्या जूनमधील नवीन शैक्षणिक वर्षापासून आपल्या मुलासाठी प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त धर्येशील जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा…कल्याण शहराला कोंडीचा विळखा

एम. जी. टी. एलिमेंटरी स्कूल, सांगोडा रोड, स्मशानभूमीजवळ, मांडा-टिटवाळा, संकल्प इंग्रजी स्कूल, बल्याणी, टिटवाळा, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, डोंगरवाली माता मंदिर, बल्याणी टेकडी, टिटवाळा पूर्व. अशी अनधिकृत शाळांची नावे आहेत. या शाळेत यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले जाईल. तसेच, या शाळांवर दंडात्मक कारवाईचा इशारा उपायुक्त जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा…आज सायंकाळी मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील ‘या’ लोकल फेऱ्या होणार रद्द

अलीकडे मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याची मोठी स्पर्धा पालकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याच्या आशेने आपल्या घराजवळच्या इंग्रजी शाळेत मुलांना दामदुप्पट शुल्क भरून, देणगी घेऊन प्रवेश घेतात. या शाळा शासन परवानगीने सुरू आहेत का. येथील शिक्षक वर्ग कोण आहे याची कोणतीही माहिती पालक घेत नाहीत. पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन शाळा चालक या नियमबाह्य शाळा चालवितात, असे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.