ठाणे : साहित्यनिर्मितीवर जातीयवादाचा वाईट प्रभाव सध्या पडत असून आताचे साहित्य आणि बातम्या हे राजकीयदृष्टय़ा सोयीच्या मांडल्या जात आहेत. यामध्ये वस्तुस्थिती दडवली जात आहे, असे प्रतिपादन कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल भैरप्पा यांनी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात बोलताना केले. अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे  यांच्या संयुक्त विद्यमाने गप्पा भैरप्पांशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. उमा कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

साहित्य लिहिताना भावना असणे गरजेचे असून तेव्हाच ते साहित्य टिकून राहू शकते. एखादी विचारधारा स्वीकारून साहित्य लिहिणे सोपे आहे. परंतु ते स्वत:च्या विचारातून लिहिणे कठीण आहे. तसेच साहित्य लिहिताना कोणाच्या दबावाला बळी पडू नये, जे असावे ते स्वनिर्मितीतून लिहावे, असे मतही भैरप्पा यांनी मांडले. 

सध्याच्या काळात आपल्या देशात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत आहेत. जेव्हा देशात चांगले घडते तेव्हा विरोधकांची संख्या वाढत असते. वाल्मीकींनी रामायणात २४ मूल्ये सांगितली आहेत. त्यापैकी एक म्हणजे जो या देशात जन्मलेला नाही त्यांनी या देशाचा राज्यकारभार चालवू नये असे सांगून त्यांची तंतू कादंबरी आजच्या काळाशी सुसंगत असल्याचे यावेळी नमूद केले. तर, या विषयावर चर्चा करताना त्यांनी नवोदित लेखकांना चांगले साहित्य वाचावे असा सल्ला दिला. सध्याच्या परिस्थितीवर सडेतोड लेखन आजच्या पिढीने केले पाहिजे. संशोधन, अध्ययन आणि त्याच्या आधारे साहित्य निर्मितीकडे तरुणांनी वळावे असेही ते म्हणाले.