तिघे इगतपुरीतून ताब्यात

कल्याण : पुष्पक एक्सप्रेसमध्ये शनिवारी इगतपुरीजवळ प्रवाशांची लुटमार करून एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणारे आठही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

या गुन्ह्यातील दोन आरोपींना धाडसी प्रवाशांनी रेल्वेतच पकडून कल्याण येथे पोलिसांच्या ताब्यात दिले होते, तर सहा आरोपी पळून गेले होते. त्यापैकी तीन आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी अटक केली.  उर्वरित तीन आरोपींना इगतपुरी येथून रविवारी दुपारी अटक करण्यात आल्याची माहिती लोकमार्ग पोलिसांनी दिली. 

अर्शद खान, प्रकाश पारधी, किशोर सोनावणे, काशिनाथ तेलंग, आकाश शेणारे, धनंजय भगत, राहुल अडोले, अर्जुन परदेशी अशी आरोपींची नावे आहेत.

लखनऊहून मुंबईकडे येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरीजवळ आठ जणांनी डब्यात प्रवेश केला. शस्त्रांचा धाक दाखवून २० प्रवाशांकडून मोबाईल, रोख रक्कम लुटली. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना बेदम मारहाण केली. प्रवाशांची लूटमार केल्यानंतर दरोडेखोरांनी पतीसोबत प्रवास करीत असलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. प्रवासी आक्रमक होताच उर्वरित सहा दरोडेखोर कसारा रेल्वे स्थानकाजवळ गाडीचा वेग मंदावताच उतरून पळून गेले. दोन दरोडेखोरांना प्रवाशांनी कल्याणला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून शनिवारी तिघांना, तर रविवारी आणखी तिघांना अटक केली.

प्रवासी संघटनेची निदर्शने

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने प्रभावी उपाय योजना कराव्यात आणि पुष्पक एक्सप्रेस प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी रविवारी महाराष्ट्र प्रवासी रेल्वे महासंघातर्फे कल्याण रेल्वे स्थानकाजवळ निदर्शने करण्यात आली.