लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : उल्हासनगर येथील शासकीय निरीक्षण गृह व विशेष गृहातील आठ १५ ते १७ वयोगटातील मुली मंगळवारी सकाळी शयनगृहातील खिडकीच्या जाळ्या तोडून पळून गेल्या. ही माहिती निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हिललाईन पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तातडीने उल्हासनगर शहरात शोध मोहीम राबवून उल्हासनगर रेल्वे स्थानक भागातून सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात यश आले. एक अल्पवयीन मुलगी मात्र पोलिसांना सापडली नाही. तिचा शोध घेतला जात आहे, असे हिललाईन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.

उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहात या अल्पवयीन मुली काही महिन्यांपासून राहत आहेत. त्यांना या निरीक्षण गृहातील सेवासुविधा आवडत नसल्याने आणि मनाजोगे राहता येत नसल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आणखी वाचा-कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, उल्हासनगर शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी शासकीय निरीक्षण आणि विशेष गृह आहे. याठिकाणी विविध वयोगटातील मुलींना ठेवले जाते. या निरीक्षण गृहातील सेवासुविधा आवडत नसल्याने काही महिन्यांपासून राहत असलेल्या आठ मुलींनी निरीक्षण गृहातून गुपचूप पळून जाण्याचा निर्णय घेतला. या निरीक्षण गृहातून मुलींना बाहेर सोडले जात नाही. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांची पाळत असते. त्यामुळे मंगळवारी सकाळी शय्यागृहात असताना आठ मुलींनी निरीक्षण गृहातील शय्या गृहातील खिडकीच्या लोखंडी जाळ्या तोडल्या. एका पाठोपाठ एक खिडकीतून उड्या मारून पळून गेल्या.

निरीक्षण गृहातील कर्मचारी फेरफटका मारण्यासाठी शय्यागृहात आला. त्यावेळी त्यांना शय्या गृहात एकही मुलगी नसल्याचे आणि खिडकीच्या लोखंडी जाळ्या तुटल्या असल्याचे दिसले. या मुली पळून गेल्याचा संशय व्यक्त करून निरीक्षण गृहातील अधिकाऱ्यांनी तातडीने हिललाईन पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आणखी वाचा-शिळफाटा रस्त्यावर नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला आग, वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे २२ प्रवासी सुरक्षित, बस खाक

पोलिसांनी तातडीने उल्हासनगर शहराच्या विविध शोध मोहीम राबवली. त्या आढळून आल्या नाहीत. या मुली उल्हासनगर रेल्वे स्थानकातून पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात शोध मोहीम राबवली. त्यावेळी उल्हासनगर रेल्वे स्थानकातून लोकलने पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी सात अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. इतर एक मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाली. तिचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader