कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचे पत्ते पोलिसांनी मागितले; अटकेची शक्यता

कल्याणमधील वाडेघर येथील एका जमिनीवर बांधकाम परवानगी देताना झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागातील आठ वरिष्ठ अधिकारी अडचणीत सापडले असून या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. यासंबंधी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या घोटाळ्यातील महापालिका अधिकाऱ्यांच्या घरचे पत्ते मागवून घेतल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्यांच्या अटकेची कारवाई सुरू करायची असल्याने पत्ते आणि माहिती कळवावी, असे या पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणात महापालिकेचे माजी आयुक्त राम शिंदे (निवृत्त), नगररचना विभागाचे तत्कालीन साहाय्यक संचालक चंद्रप्रकाश शिवकुमार सिंग, सुनील हजारे, निवृत्त व निलंबित कार्यकारी अभियंता पाटीलबुवा उगले, नगररचनाकार रघुवीर शेळके, कनिष्ठ अभियंता मनोज सांगळे, ज्ञानेश्वर आडके, ठाकरे, शिरवाडकर आणि वास्तुविशारद बी. जी. फडणीस यांचा सक्रिय सहभाग असल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणात ‘मेसर्स महादेव होम्स’चे भागीदार महेश लालचंदानी, हरी भाटीया, महसूल विभागाचे तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी यांचा सहभाग आहे. हरी भाटीया यांच्यावर आपल्या आदेशाशिवाय कारवाई करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

काय आहे प्रकरण?

कल्याण पश्चिमेतील मौजे वाडेघर येथे सव्‍‌र्हे क्रमांक ३८ येथे कासम राजकोटवाला यांची ६ हजार १७० चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन होती. या जमिनीच्या १८०० चौ. मीटर क्षेत्रफळावर पाणीपुरवठा व मलनिस्सारण वाहिन्या आहेत. उर्वरित ३३७० चौ. मी. क्षेत्र नागरी कमाल जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त घोषित झाल्याने जमीनमालक राजकोटवाला यांच्या ताब्यात फक्त १ हजार चौ. मी. क्षेत्रफळ ताब्यात होते. कासम यांनी आपल्या ताब्यातील जमिनीवर बांधकाम करण्याचे कुलमुखत्यारपत्र विकासक महेश लालचंदानी, वास्तुविशारद बी. जी. फडणीस यांना दिले होते. महापालिकेच्या तत्कालीन नगररचना अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची छाननी न करता एक हजार चौ. मी.ऐवजी बेकायदा २०५० चौ. मी. क्षेत्रावरविकासकाला बांधकामास परवानगी दिली होती.

दरम्यान २००५ मध्ये कासम यांच्या एक हजार चौ. मी. क्षेत्राची बनावट ताबा पावती पालिकेच्या तत्कालीन मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांनी तयार केली, अशी तक्रार आहे. हे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटर दाखविण्याऐवजी ते २०५० चौरस मीटर इतके दाखविण्यात आले. सात बारा उतारा कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नावे करण्यात आला. कासम यांच्या मृत्यूनंतर पुन्हा बनावट ताबा पावती तयार करून विकासकाने रीतसर महसुली दस्तऐवज तयार करून घेतले. विकासकाच्या या सगळ्या कटात महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी सहभागी होते, असा आरोप याप्रकरणी तक्रारदारांनी केला . कासम राजकोटवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा वारस एक हजार चौ. मी.च्या  क्षेत्रफळावर वारस म्हणून घोषित करण्यात आले. वारसदार अंजूम कासम राजकोटवाला (खान) यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर दक्ष नागरिक श्रीनिवास घाणेकर यांच्या साहाय्याने महसुली कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्यांना तलाठी, मंडळ अधिकारी, पालिकेच्या मालमत्ता, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून मोठा बांधकाम घोटाळा केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात एक हजार चौ. मी. क्षेत्रात विकासकाने बांधकाम करण्याऐवजी विकासकाने चार वेळा सुधारित बांधकाम परवानग्या घेऊन वाढीव २०५० चौ. मी. बांधकाम कसे आणि कुठून केले तसेच दोन वेळा बनावट ताबा पावत्या पालिकेच्या मालमत्ता विभागाने तयार कशा केल्या, असे प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात पालिका, महसूल अधिकाऱ्यांनी संगनमत करून पालिकेची फसवणूक केल्याने श्रीनिवास घाणेकर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

एका गुन्हा प्रकरणी पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या पत्ते बाजारपेठ पोलिसांना कारवाईच्या कामासाठी हवे होते. पालिकेला याबाबत पोलिसांकडून पत्र आले होते. संबंधित अधिकाऱ्यांचे पत्ते पोलिसांना कळविले आहेत. – दीपक पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन, कडोंमपा