ठाणे -शहरातील चेंदणी कोळीवाडा येथे होळीच्या पूर्वसंध्येला साजरी होणारी ‘एक गाव एक होळी’ ही चळवळ गावकीच्या एकजुटीची प्रतीक मानली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने होळीच्या पूर्वसंध्येला ‘एक गाव एक होळी’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व आगरी कोळी बांधव, महिला पारंपारिक वस्त्रे परिधान करुन एकत्र येत मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. यावेळी कोळीगीते आणि कोळी बॅण्डवर सर्व कोळी बांधव ताल धरला.

फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण उत्साह आणि जल्लोषाची पर्वणी असते. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात ‘शिमगा’ म्हणजेच ‘होळी’ हा सण साजरा करण्याची पारंपारिक प्रथा वर्षांनुवर्षांपासून चालत आली आहे. त्याचप्रमाणे, ठाण्यातील चेंदनी कोळीवाडा येथे ‘एक गाव एक होळी’ ही प्रथा अनेक वर्षापासून जोपासली जात आहे. ‘एक गाव एक होळी’ ही पद्धत खरंतर फार पूर्वीपासूनची होती. परंतू, ८४ वर्षांपूर्वी हा उत्सव काही कारणास्तव बंद झाला होता. २०१५ साली कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकात नाखवा होते. त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन या उत्सवाला पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्यानुसार, यंदा या ‘एक गाव एक होळी’ चे हे ११ वे वर्षे असल्याची माहिती या गावातील डॉ. गिरीश साळगांवकर यांनी दिली.

या उत्सावात गावातील नविन जोडपी पारंपारिक वेशभुषेत सहभागी होतात. नविन जोडप्यांच्या हस्ते होळीची पूजा करण्याची परंपरा गेले वर्षानुवर्ष या गावात सुरु आहे. तसेच गावातील आबालवृद्ध, महिला, तरुण यांचाही उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळतो. तर,ठाणे शहरातील चेंदणी कोळीवाड्यासह कोपरी गाव, हजुरी गावठाण आणि महागिरी कोळीवाडा येथेही गेले अनेक वर्षांपासून “एक गाव, एक होळी” मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यावर्षी विविध गावांमध्ये होळी उत्सवाच्या निमित्ताने अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विशेषतः तरुणांसाठी होळी क्रिकेट चषक स्पर्धांचे आयोजन झाले असून विजेत्यांना बोकड, कोंबडी आणि अंडी असे पारंपरिक बक्षीसे देण्यात आली. यामुळे या स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘आमच्या दाराशी हाय शिमगा,”सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा’ अशा होळीशी निगडिच विविध गाण्यांच्या तालावर कोळी बांधवांनी एकत्रित येत नृत्य सादर केले. वर्षांनुवर्षांपासून सुरु असलेला ‘एक गाव एक होळी’ चा उत्सव पाहण्यासाठी शहराच्या विविध भागातील नागरिक याठिकाणी येतात. यंदाही हा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Story img Loader