शहापूर : राज्यात आषाढी एकादशी सोहळा साजरा होत असताना, शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात अभंग आणि भजनांचा सुरेल ठेका धरत काढलेल्या पालखी सोहळ्याने तालुक्यातील खराडे परिसर भक्तिमय झाला. आबालवृद्धांसह ग्रामस्थ महिलांनीही या सोहळ्याचा आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता अभियानाच्या घोषणा देखील दिल्या.
आषाढी एकादशी निमित्ताने विठू माऊलीचा गजर पंढरीसह राज्यात निनादत असताना शहापुर तालुक्यातील खराडे येथील जिल्हापरिषद शाळाही विद्यार्थ्यांच्या भक्तीपूर्ण वातावरणात आज न्हाऊन निघाली. शहापुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या खराडे येथील केंद्र शाळेत मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत शाळेच्या प्रांगणात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, विठोबा-रखुमाई, वारकरी वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती. टाळ, मृदंगाचा ठेका घेत लयबद्ध पद्धतीने अभंग आणि भजनांनी अवघा परिसर दुमदुमला होता. विद्यार्थ्यांनी पंढरीचीवारी शाळेच्या प्रांगणात उभी केली. गावागावातून दिंडी काढून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यावर आधारित संदेशात्मक घोषणा देत सामाजिक जाणीवही दाखवली. गावातून फिरणाऱ्या या दिंडीत अबालवृद्ध ग्रामस्थांचे टाळ मृदुंगातील भजने आणि महिलांनी झिम्मा-फुगडी खेळून दिंडीचा आनंद घेतला. या दिंडीत पर्यावरण, वृक्षारोपण, स्वच्छता, मूल्यशिक्षण या संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केल्याने ही वारी समाजप्रबोधनाचे माध्यम ठरली असल्याचे दिसून आले. शाळेचे मुख्याध्यापक जयश्री पाटील, शिक्षक बाळकृष्ण निमसे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांसह खराडे येथील वकील हरेश साबळे यांनी केलेल्या कार्यक्रमाचे नियोजन केले.