Eknath Khadse criticized shinde government says Cabinet expansion delayed to avoid discontent criticized ssb 93 | Loksatta

“असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर”, एकनाथ खडसेंची टीका

हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने सर्वत्र अनागोंदीची परिस्थिती आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

Eknath Khadse on Cabinet expansion
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ठाणे – सात महिने होत आले तरी राज्यातील १८ मंत्रीच राज्याचा कारभार करत आहेत. हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने सर्वत्र अनागोंदीची परिस्थिती आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री शिंदे सरकारने केला तर शिंदे यांच्या पक्षातील, भाजपमधील सर्वच आमदार, नेते मंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्वांना मंत्री मंडळात सामावून घेणे शक्य नाही. हा शिंदे गट आणि भाजपमधील असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे केली.

कल्याणमधील लेवा पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमासाठी नेते खडसे कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात सध्या अराजक सदृश्य परिस्थिती आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. उद्योग बाहेरच्या प्रांतात जात आहेत. राज्यावर सहा लाख ६६ हजार कोटींचे कर्ज आहे. यामधील सर्वात मोठे कर्ज गेल्या सात महिन्यांच्या काळातील आहे. विकास कामांच्या नावाखाली हे कर्ज घेण्यात आले असले तरी राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे, असे खडसे म्हणाले.

हेही वाचा – डोंबिवलीत लोढा कासारिओ गोल्डमध्ये वाहनाच्या धडकेत पाळीव श्वानाचा मृत्यू

राज्यातील एका सी सर्व्हेक्षणानुसार राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. हा दावा सत्य परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यात चूक काही नाही. आताची परिस्थिती त्या सर्व्हेक्षणातून दिसते. राज्यातील शिंदे सरकार अस्थिर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे, असे खडसे म्हणाले. सामान्य माणसाची आताच्या परिस्थितीत सर्वाधिक होरपळ होत आहे. त्याचा राग तो मतपेटीतून व्यक्त करील. सर्व्हेक्षणाचा अहवाल त्याचे प्रतिबिंब आहे, असे खडसे म्हणाले.

हेही वाचा – कल्याण: दाट धुक्यामुळे कसारा-कर्जत मार्गावरील लोकल उशिरा

रवींद्र चव्हाण यांची टीका

राज्याचा कारभार गतिमानतेने सुरू आहे. अनेक विकास कामांचे यापूर्वी रखडविलेले प्रकल्प आता गतीने सुरू केले जात आहेत. हा सगळा प्रवास अनेकांना सहन होत नाही. त्यामुळे आपला टीरआपी वाढविण्यासाठी काही जण प्रसिद्धीलोलुप वक्तव्य करत आहेत, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खडसेंवर केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 12:15 IST
Next Story
डोंबिवलीत लोढा कासारिओ गोल्डमध्ये वाहनाच्या धडकेत पाळीव श्वानाचा मृत्यू