ठाणे : ठाण्यात २५ वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती. आता आमची झालेली युती ही सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शुक्रवारी रिपब्लिकन सेनेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या वेळी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर उपस्थित होते. शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातले सर्वोत्तम संविधान दिले. त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकते.

मी शेतकऱ्याचा मुलगा असूनही राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो आणि नरेंद्र मोदी हे देखील पंतप्रधान झाले. हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले असे शिंदे म्हणाले. आनंदराज यांनी कुठल्याही अटी-शर्तीविना युती केली. माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची एकमेव मागणी होती. ही युती सत्तेसाठी नाही, तर दलित, वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे असे त्यांनी सांगितले. इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने सुरू असल्याचेही ते म्हणाले.