ठाणे : मुख्यमंत्री असताना ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करून राज्यातील महिलांमध्ये वेगळी छाप उमटवणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लाडका भाऊ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी असल्याचे ते सातत्याने सांगत असतानाच, त्यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये महिला महापौरांची निवड केली. त्यामुळे या तीन महत्त्वाच्या शहरांची धुरा त्यांनी थेट ‘लाडक्या बहिणींच्या’ हाती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील महिलांना थेट लाभ देण्यावर तिचा भर आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. यात गरजू, मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ‘लाडकी बहीण योजना’ ही एक प्रभावी आणि चर्चेत असलेली योजना मानली जात आहे. याच योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील महिला वर्गात ‘लाडका भाऊ’ अशी ओळख मिळाली. ही ओळख टिकवण्याचे काम ते सातत्याने करताना दिसून येत असून यातूनच त्यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन शहरांची सूत्रे लाडक्या बहिणींच्या हाती दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तिन्ही शहरात शिंदे सेनेचा महापौर

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये सत्तासहभागावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये दबाबतंत्राचे राजकारण सुरू होते. यामुळे महापौर कुणाचा होणार, अशी चर्चा सुरू असतानाच, शुक्रवारी दाखल झालेल्या अर्जानुसार, तिन्ही ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा महापौर तर, भाजपचा उपमहापौर होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

लाडक्या बहिणीच्या हाती कारभार

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर ही शहर महत्वाची मानली जातात. यातील कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर ही शहर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात येतात. या तिन्ही शहरात भाजपच्या दबावतंत्रनंतरही शिंदे सेनेने आपल्या पक्षाचा महापौर नेमला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना (शिंदे गट)च्या शर्मिला पिंपळोलकर, कल्याण-डोंबिवलीत ॲड. हर्षली चौधरी-थविल, तर उल्हासनगरमध्ये अश्विनी कमलेश निकम या महिला महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तिन्ही ठिकाणी भाजपकडे उपमहापौर पद देत युतीचे गणित जुळवण्यात आले आहे.

‘लाडका भाऊ’ ही प्रतिमा ठळक

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी महिला महापौरांची नियुक्ती केली असून यातून त्यांनी ‘लाडका भाऊ’ ही प्रतिमा अधिक ठळक करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या तिन्ही शहरांची सूत्रे थेट महिलांच्या हाती देण्यात आल्याने महिला सक्षमीकरणाचा स्पष्ट राजकीय संदेश दिला जात असल्याची चर्चा सुरू आहे.