ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्वांत वेदनादायी दिवस असेल तर तो २ जून २००० सालचा. आज २६ वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन लहान मुलांना गमावले होते. दीपेश आणि शुभदा ही एकनाथ शिंदे यांची दोन मुले. महाबळेश्वर येथे जलक्रिडा करताना बोट उलटून त्यांचे निधन झाले होते. या दु:खातून शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी त्यांना कसे बाहेर काढले, याबाबत जाणून घेऊया.
शिवसेनेत एकनाथ शिंदे नगरसेवक म्हणून चांगली कामगिरी करत असल्याने दिवंगत आनंद दिघे यांनी २००० मध्ये त्यांना ठाणे महापालिकेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी दिली होती. या आनंदामुळे शिंदे हे कुटुंबासह महाबळेश्वरला मुलगा श्रीकांत, दीपेश, शुभदा आणि पत्नी लता यांच्यासोबत निघाले होते. महाबळेश्वरला मुक्कामाला असताना त्यांनी दोन बोटी मागविल्या होत्या. एका बोटीत एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी होते. तर दुसऱ्या बोटीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भावांची मुले होती. बॅकवाॅटर फिरत असताना शुभदा आणि दीपेश यांचे लक्ष किनाऱ्यावरील स्कुटर बोटीकडे गेले. त्यांनी स्कूटर बोटीमध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केल्याने दोघेही स्कूटरबोटवर बसले. बोट वळण घेत असतानाच ती उलटली आणि दोघेही बुडाले.
शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु कुठेही आढळून आले नाही. त्यांच्या सहकाऱ्यांनी जाळे आणले. त्या एका जाळ्यात शुभदा अडकली. तिला किनाऱ्यावर आणले. परंतु तीची हालचाल होत नव्हती. दीपेशला माग लागत नव्हता. आनंद दिघे यांना घटनेची माहिती मिळताच, ते तात्काळ ठाण्यातील सर्व जवळच्या शिवसैनिकांना घेऊन महाबळेश्वर येथे पोहचले. अखेर दीपशेचा मृतदेह सापडला. दोन मुलांना गमावल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नीने आक्रोश केला. दोन्ही मुलांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर शिंदे हे मोडले गेले होते.
अन सभागृहनेते
- आनंद दिघे शिंदे यांच्या घरी येऊन त्यांची समजूत काढत होते. त्यांनी त्यांना एकदिवस सभागृहात येण्याचे आदेश त्यांना दिले. महापालिकेत पोहचल्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे सभागृह नेते राजन विचारे यांना नेतेपद सोडणार का असे विचारले. त्यांनी क्षणार्थात ‘तुम्हीच दिले, तुमचा अधिकार आहे, काढून घ्यायचा असे राजन विचारे यांनी आनंद दिघे यांना म्हटले. सभागृहनेते झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
(टीप- बातमीसाठी काही माहिती- योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे- पुस्तकातून घेतली असून पुस्तकाचे लेखक- प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ आणि डाॅ. अरुंधती भालेराव आहेत)
