ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोवण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी व प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाला वेगळे वळण देण्यासाठी पूर्णेकर यांच्या समर्थकांसोबत काही अघटित घडविण्याचा विरोधकांचा कट असल्याचा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. असे काही घडल्यास सत्ताधारी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्यावर या प्रकरणाचे आरोप केले जातील, यासाठी विरोधकांच्या बैठका सुरू असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, राम पूर्णेकर, त्यांचे कुटुंबीय व निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र पोलीस आयुक्तांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चात आदित्य ठाकरे यांच्यासोबत काही गुन्हेगारही सहभागी झाले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांकडून सातत्याने शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहेत. या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर समर्थकांकडून विविध ठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनीच आता पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकारणात एखाद्याचे खच्चीकरण करण्यासाठी खालच्या पातळीवरील लोकही सक्रिय असतात. माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. माझे मनोबल स्थिर आहे. मात्र, माझ्याऐवजी दुसरी एखादी महिला असती तर तिने आत्महत्येच्या दिशेने पाऊल उचलले असते, असे वक्तव्यही मीनाक्षी शिंदे यांनी केले.

माजी खासदार राजन विचारे व प्रदीप पूर्णेकर यांच्यात कधीही सलोख्याचे संबंध नव्हते, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात विचारे यांनी एकदाही मानपाडा परिसरात प्रचार केला नव्हता. प्रदीप पूर्णेकर यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरूनही विचारे यांच्यासारखा नेता नको, अशी भूमिका मांडली होती, असे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या. राजन विचारे व एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरूनच राम पूर्णेकर यांच्याकडून आपल्यावर आरोप करण्यास सुरुवात झाल्याचा दावाही त्यांनी केला.

‘पदाधिकारी टिकवता आले नाहीत’

आनंद दिघे यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात दिघे यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांना वेळ मिळाला नाही. आता राजकारण करण्यासाठी ते मानपाडा येथे आले, अशी टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली. ठाण्यात आनंद दिघे यांनी पक्ष वाढविला. मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहीले नाही ही शोकांतिका आहे. उद्धव ठाकरे यांना खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकारी टिकवता आले नाहीत; मात्र समाजमाध्यमे हाताळणारा गट त्यांनी टिकवून ठेवला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा

आयुक्तालयाचे प्रेशद्वार बंद

मीनाक्षी शिंदे मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या भेटीसाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात आल्या होत्या. त्यांच्या आगमनापूर्वीच पोलिसांनी आयुक्तालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. आयुक्तालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची चौकशी करूनच त्यांना आत सोडले जात होते. माध्यम प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला. सुव्यवस्था राखण्यासाठी प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मीनाक्षी शिंदे आयुक्तालयात दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात होती. एका नगरसेविकेच्या भेटीसाठी चक्क आयुक्तालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

‘राजकीय स्वार्थासाठी वापर’

मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, माजी खासदार विनायक राऊत, राजन विचारे, केदार दिघे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, मनसेचे नेते अविनाश जाधव व अभिजीत पानसे हे पूर्णेकर हत्याप्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी कटकारस्थान रचले जात असून, जनतेत खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यासाठी समाजमाध्यमांचा गैरवापर केला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जनआंदोलनाच्या नावाखाली आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचाही दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीय व त्यांना मदत करणाऱ्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, ही आपली प्राथमिकता असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यानुसार राम पूर्णेकर, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच पूर्णेकर यांचे निकटवर्तीय दिनेश पवार, अखिलेश पाल, प्रशांत मोटे, आनंद भोईर, किसान तट्टे आणि विवेक पांढरे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.