ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शिंदे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना ताप आला होता. तसेच त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. कामाचा ताण आणि प्रचंड दगदग यामुळे त्यांची शुक्रवारी प्रकृती बिघडली होती. ताप उतरत नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला होता. यानंतर त्यांना शुक्रवारी तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. रक्त तपासणी करण्यात आली होती. त्याचे सर्व अहवाल सामान्य आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा तापही उतरला होता आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यांना थकवा मात्र जाणवत होता. दरम्यान, शिंदे यांनी रविवारी रुग्णालयातूनच त्यांच्या विभागाच्या कामाचा आढावा घेतला होता. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची संवाद साधून परिस्थितीची माहिती घेऊन त्यांना सुचनाही केल्या होत्या.
शिंदे हे लवकर बरे व्हावेत यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रार्थना करीत होते. समाज माध्यमांवर तसे संदेश प्रसारित केले जात होते. दरम्यान, गेले तीन दिवस उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल समाधानकारक आल्याने डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देत घरी सोडल्याचे सुत्रांनी सांगितले.
