ठाणे : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शुक्रवारी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ताप उतरत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात नुकतेच ”टायगर ऑपरेशन” राबवत ठाकरे गटाच्या खासदारांना आपल्या पक्षात प्रवेश घेतले होते. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे आमदार सचिन अहिर यांनाही पक्षात घेऊन ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. पक्ष वाढीच्या कामात व्यस्त असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती शुक्रवारी बिघडली. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना त्यांना ताप आला होता. तसेच त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. कामाचा ताण आणि प्रचंड दगदग यामुळे प्रकृती बिघडल्याचे बोलले जात आहे.
ताप उतरत नसल्यामुळे डाक्टरांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर त्यांना शुक्रवारी तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची प्रकृती व्यवस्थित असून प्रकृतीबाबत कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. आजच त्यांना घरी सोडण्यात येईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
