निवडणुकीच्या काळात आपण कसे प्रवाशांच्या हितासाठी झटत आहोत, असे भासवायचे आणि त्यानंतर प्रवाशांना त्रास देणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष करायचे, असा प्रकार ठाण्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून होत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रेल्वे स्थानक परिसरात दौरा काढून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुजोर रिक्षाचालकांना कशी अद्दल घडवितो आणि प्रवाशांच्या हितासाठी पुढाकार घेतो, असे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता गेल्या महिनाभरापासून ठाण्यातील रिक्षाचालक प्रवाशांना वेठीस धरत असतानाही शिंदे यांनी याकडे डोळेझाक केले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनाचा देखावा करणारे हे नेते आता कुठे गेले, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या महिनाभरात दोन वेळा रिक्षा चालकांनी अघोषित संपाचे हत्यार उगारत ठाणेकर प्रवाशांची अक्षरश: छळवणूक केली. शहरातील वेगवेगळ्या रिक्षाचालक संघटनांना सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा असल्याने मनाला वाटेल तेव्हा रिक्षाचालक रस्त्यावर उतरतात आणि प्रवाशांना वेठीस धरतात, असे दृश्य सातत्याने दिसत आहे. प्रवाशांना भाडे नाकारणे, अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, रिक्षांचे बॅच, परवाने नसणे, बोगस रिक्षा यांविरोधात ठाणे पोलीस आणि परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कारवाई सुरू केली.
या कारवाईमुळे नियमांची तमा न बाळगत व्यवसाय करणाऱ्या अनेक रिक्षा चालकांचे धाबे दणाणले असून आपले आश्रयदाते असलेल्या नेत्यांकडे जाऊन ही कारवाई टाळता कशी येईल, यासाठी धावपळ सुरू झाली आहे. साधारण १५ दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनानंतरही पोलीस दाद देत नसल्याचे पाहून बुधवारी सकाळी ठाण्यातील काही चालकांनी पुन्हा आंदोलन केले. ठाण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाने या दादागिरीला पाठिंबा दिल्याने या मुजोर रिक्षाचालकांना आणखी स्फूरण चढले. मात्र यामुळे सर्वसामान्य ठाणेकराचे हाल सुरू आहे.

शिवसेनेची डोळेझाक
तब्बल साडेतीन वर्षांपूर्वी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे रेल्वे स्थानक परिसरात अवतरले होते. त्यांनी गावदेवी आणि सॅटिस रिक्षा थांब्यावर स्वत: उभे राहून प्रवाशांना रिक्षांमध्ये बसविले. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या श्रीमुखात भडकवत प्रवाशांची वाहवा मिळवली. ‘आम्हीच तुमचे तारणहार’ असे चित्र निर्माण करण्यात त्यावेळी शिंदे कमालीचे यशस्वी ठरले. एरवी टीएमटीच्या गर्दीत आणि रिक्षा चालकांच्या नकारघंटेमुळे हैराण झालेल्या ठाणेकरांनाही आठवडाभराचा दिलासा मिळाला. ठाणेकरांच्या हिताची भाषा करणारी ही शिवसेना महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रवाशांच्या छळवणुकीकडे मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. साडेतीन वर्षांपूर्वी आमदार असलेले एकनाथ शिंदे आता पालकमंत्री झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ठाणे स्थानक गाठणारे शिंदे आता कुणीकडे गेले, असा सवाल प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. यासंबंधी शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही तो होऊ शकला नाही. ‘साहेब आज दिवशभर ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन’ योजनेच्या बैठकीत होते, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.  

रुग्णांचे हाल
पूर्व द्रुतगती मार्गावरील ‘कोरम मॉल’जवळ असणाऱ्या क्रिटीकेअर रुग्णालयात माझ्या आजीला दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तातडीने पोहचणे आवश्यक होते. परंतु रिक्षाचालकांनी अचानक केलेल्या या रिक्षा संपामुळे ठाणे रेल्वे स्थानकाजवळील रिक्षाथांब्यात एकही रिक्षा उपलब्ध नव्हती. इस्पितळात तातडीने जायचा हा प्रसंग कोणावरही, कधीही येऊ शकतो. या सगळ्या परिस्थितीत आम्ही करायचे तरी काय? रस्त्यावरील उर्वरित रिक्षाचालकांना विचारले असता, दोनशे ते अडीचशे रूपयांची मागणी केली जाते.                       
– ओमकार सहासने, ठाणे

जयेश सामंत, ठाणे