ठाणे : गावदेवी मंडई दुर्घटनांची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गावदेवी मार्केट लोकार्पण कार्यक्रमात बोलताना पालिका प्रशासनाला दिली. तर व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
ठाणे स्थानक परिसरालगत गावदेवी मंडई होती. यात १५५ व्यापाऱ्यांचे ओटले होते. याच मंडईच्या पहिल्या मजल्यावरच ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीचे कार्यालय होते. २१ मे २०२६ रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीत सर्व ओटले जळून खाक झाले होते व मार्केटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर काम करत मार्केटचे नूतनीकरण केले. नव्या मार्केटमध्ये विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम, रंगरंगोटी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे काम पूर्ण होताच, गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मार्केटचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे,विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, आयुक्त सौरभ राव, पालिका अधिकारी आणि पदाधिकारी तसेच गावदेवी मार्केटमधील ओटलेधारक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केले. अवघ्या ६० दिवसांत गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.
