Eknath Shinde MMRDA Budget 2026 : राज्य सरकारमध्ये सध्या दोन सत्ता केंद्र आहेत. त्यात सर्वात पहिला नंबर लागतो तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तर दुसरा नंबर लागतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. दोन्ही नेते त्यांच्या पक्षाचे राज्यातले प्रमुख आहेत. दोन्ही नेत्यांचे प्रकल्प ही त्यांची स्वतंत्र ओळख असते. मुख्यमंत्री असल्याने सत्तेची बहुतांशी सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. मात्र उपमुख्यमंत्री असूनही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे ते विकास प्रकल्पांच्या बाबतीत पहिले ठरले आहेत. याची प्रचिती अनेक निर्णयांतून येतच असते, मात्र नुकताच सादर झालेला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए अर्थसंकल्प बरंच काही सांगून जातो.
सत्तेत असूनही दोन नेत्यांमधली स्पर्धा कधी लपून राहत नाही. ती कधी कुरघोड्यांच्या रूपाने असते, तर कधी प्रकल्पांच्या बाबतीत असते. मुंबई महानगर हे एकनाथ शिंदे यांची हक्काची खेळपट्टी आहे. मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी पर्यायाने महानगर क्षेत्रावर आपली पकड मजबूत केली आहे. राज्यातील नगर परिषद, नगर पालिका, महापालिका यांच्यावर नगर विकास विभागाच्या माध्यमातून तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई महानगरावरही शिंदेंनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून शिंदे यांनी आपल्या ठाणे जिल्ह्यात प्रकल्पांची पायाभरणी सुरू केली होती. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात आणि महानगर क्षेत्रात त्याची विशेष छाप दिसून येते.
४८ हजार कोटींचा अर्थसंकल्प
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यंदा पहिल्यांदाच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा शिलकी अर्थसंकल्प सादर झाला. यापूर्वी तुटीच्या अर्थसंकल्पावरून शिलकीच्या अर्थसंकल्पावर मारलेली मजल ही प्राधिकरणासह एकनाथ शिंदे यांच्यासाठीही यशाची पायरी ठरली. एकूण ४८ हजार कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. मात्र या अर्थसंकल्पातील बहुतांश प्रकल्प हे शिंदेंच्या स्वतःच्या ठाणे जिल्ह्यात आहेत हे विशेष. तब्बल ३० हजार कोटी आणि त्यापेक्षा अधिकचे प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांत होणार आहेत. म्हणजे एकूण अर्थसंकल्पाच्या सुमारे ६३ टक्के तरतूद ठाणे आणि आसपासच्या भागासाठी करण्यात आली आहे.
या प्रकल्पांचा एकूण महानगर क्षेत्राला मोठा फायदा होणार हे नक्की. सध्या रडतखडत चाललेली महानगरातील वाहतूक, नवी मुंबई विमानतळाच्या खुले होण्याने वाहतुकीचा बदललेला मार्ग, अवजड वाहतूक, कोंडी या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएच्या प्रकल्पांची योजना भविष्यकालीन गतीमानतेला बळ देणाराच आहे. मात्र त्यावर शिंदेंचे असलेले वर्चस्व त्यांना प्रकल्पांच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर घेऊन जातो.
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात (२०२६-२७) मध्ये ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी विशेष तरतूद
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली यंदाच्या एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्गिकांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. ठाण्यातील पहिली मेट्रो लवकर सुरू होईलच. पण त्याच वेळी इतर मार्गिकाही वेगाने मार्गी लागाव्यात यासाठी शिंदेंचे विशेष लक्ष आहे. नागपूर मेट्रो सुरू झाली असली तरी ठाणे मेट्रो अजून अखेरच्या टप्प्यात आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाण्यात मेट्रोला लागणारा उशिर हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. त्यामुळे विकास प्रकल्पांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या मेट्रो मार्गिकांना गती देण्याची गरज ओळखून शिंदेंनी यासाठी मोठी तरतूद केली आहे.
मुंबईला ठाण्याशी जोडणारी पहिली मेट्रो म्हणून मार्गिका क्रमांक ४ अर्थात कासारवडवली–वडाळा ओळखली जाते. त्यासाठी ३ हजार ६३१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा विस्तार असलेली कासारवडवली ते गायमुख या मेट्रो ४ अ मार्गिकेसाठीही १७६ कोटी, तर स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो ६ साठी २ हजार ४०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो ५, त्याचा विस्तार असलेला दुर्गाडी ते उल्हासनगर या मेट्रो ५ अ, कल्याण-तळोजा मेट्रो १२, त्याचा विस्तार असलेला मार्ग मेट्रो १२ अर्थात डोंबिवली ते शिळफाटा मार्गे तळोजा, कांजुरमार्ग – बदलापूर मेट्रो १४ अशा मार्गांसाठीही भरीव तरतूद आहे. हे मार्ग शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील आहेत.
मेट्रोसह ठाणे शहरातील आणि विशेषतः शहराच्या वेशीवरची कोंडी फोडण्यासाठी आवश्यक प्रकल्पांनाही शिंदेंनी बळ दिले आहे. ठाणे – बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग (Twin Tunnel) यासाठी ३ हजार ०२९.५१ कोटी, ठाणे किनारा (कोस्टल रोड) मार्गासाठी १ हजार ०२५.७७ कोटी, घोडबंदर रस्ता भुयारी मार्गासाठी ७५ कोटी ही भरीव तरतूद आहे.
ठाणे शहरातील प्रकल्पांनाही शिंदेंनी बळ दिले आहे. तलावांचे शहर ही ठाणे शहराची ओळख आहे. ही ओळख जपण्यासाठी शिंदेंनी त्यासाठी निधी दिला आहे. बहुचर्चित रायलादेवी तलाव सुशोभीकरणासाठी ८० कोटी, मासुंदा तलाव सुशोभीकरण – ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येऊर पायथ्याशी रस्ता करण्यासाठी ५० कोटी दिले आहेत. ठाणे किनारा मार्ग (कोस्टल रोड) टप्पा-२ या खारेगाव–कोपरी टप्प्यासाठी २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोलशेत ते काल्हेर खाडी पूलासाठी ९४ कोटी ठेवण्यात आले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्ग असलेला आनंदनगर ते साकेत हा मार्ग उन्नत मार्ग करण्यासाठी ८८०.१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे क्लस्टर अर्थात ठाणे विभागासाठी अंदाजे १२ ते १३ हजार कोटी तर कल्याण क्लस्टरसाठी अंदाजे ३ हजार ५०० कोटींपेक्षा अधिकची तरतूद केल्याचे दिसून येते.
शिंदेंच्या जिल्ह्यात प्रकल्पांचा रतीब
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एमएमआरडीएच्या माध्यमातून असंख्य प्रकल्प सुरू आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात यात आणखी नव्या प्रकल्पांची भर पडली आहे. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातही थेट नागपूरशी स्पर्धा करणारे प्रकल्प उभे राहत आहेत. नागपूरनंतर पहिला डबल-डेकर अर्थात द्विस्तरीय उड्डाणपूल कल्याण लोकसभा मतदारसंघातच उभा राहतो आहे. नवी मुंबईच्या वेशीवरील शिळफाटा ते भिवंडीच्या राजनोली चौकात हा मार्ग उभारला जाणार आहे. या मार्गाच्या पहिल्या स्तरावर वाहने चालतील, तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्गिका असेल. पहिला दुहेरी बोगदा (ट्विन टनल) ठाण्यातून बोरिवलीला जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही जमेची बाजू असणार आहे.
