ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सोमवारी झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात वंदे मातरम् सादरीकरणाबाबत गोंधळ झाल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित असताना ‘वंदे मातरम्’ची वेगळी संगीतबद्ध आवृत्ती ध्वनीक्षेपकावर वाजविण्यात आली. या प्रकारावर शिंदे यांनी आपल्या भाषणातून संयोजकांना सुनावले.
मुंबई महानगरातील अमराठी भाषिक रिक्षा आणि टॅक्सीचालकांना व्यवहारोपयोगी मराठी भाषा शिकविण्यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाचा सांगता समारंभ सोमवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची माहिती शिंदे यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमधूनही समोर आली आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रथम ‘वंदे मातरम्’, त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत वाजविण्यात येणार असल्याचे निवेदकांनी सांगितले. मात्र त्यानंतर ‘वंदे मातरम्’ची अपेक्षित सादरीकरण पद्धत न राहता वेगळी आवृत्ती वाजविण्यात आली. ही आवृत्ती सुमारे चार मिनिटे सुरू होती. दरम्यान, २८ जानेवारीला गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या पार्श्वभूमीवर ‘वंदे मातरम्’च्या सहा कडव्यांच्या सादरीकरणाला महत्त्व देण्यात आले आहे. तिचा कालावधी तीन मिनिटे दहा सेकंद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे भाषण संपविताना वंदे मातरमच्या आवृत्तीवरुन नाराजी व्यक्त केली. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमांत संसदेने मान्यता दिलेले अधिकृत वंदे मातरम् गायले जावे, असे संयोजकांना सुनावले.
