कल्याण – मुंंबईत दादर येथील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा कोणीही असो. त्याला सोडले जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी बोलणे झाले आहे. संबधित समाजकंटकाने केलेले कृत्य अतिशय निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कल्याण तालुक्यातील पलावा खोणी येथील मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज योजनेच्या जिल्हास्तरिय शुभारंंभाच्या वेळी माध्यमांना दिली.

मीनाताई ठाकरे या तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब म्हणून ओळखल्या जातात. मिनाताई यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे, भाजप इतर पक्षांमधून याविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची समाजकंटकाने केलेली विटंबना अतिशय निंदनीय आहे. हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन समाजकंटकाच्या अटकेसाठी गृहविभागाला आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांशी यासंदर्भात आपले बोलणे झाले आहे. त्यामुळे घडला प्रकार अतिशय निषेधार्ह आहे. कोणत्याही परिस्थितीत हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकाला सोडले जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी शासन प्रयत्नशील असेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बोटे छाटणार

तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाची बोटे छाटल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी दिला आहे. घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेऊन आम्ही शिवसैनिक त्या समाजकंटकाची बोटे छाटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तेलगोटे यांनी दिला आहे. कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील शिवसैनिकांनी घडल्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.