Maharashtra Political Analysis BJP Shivsena नगरपालिका निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यभर एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केल्यानंतर महायुतीत, विशेषत: भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मैत्रीचा राग आळ‌विण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे आर्थिक बलस्थान असलेल्या मुंबई ठाण्यासह संपूर्ण महानगर प्रदेशात युती व्हावी यासाठी शिंदे कमालीचे आग्रही आहेत. त्यामुळे भाजपसोबत प्रवेशबंदीचा तह व्हावा याच दिशेने त्यांची वाटचाल दिसते. मुंबईत भाजपचे शिंदे यांच्याविषयी नरमाईचे धोरण दिसते.

ठाण्यात ८२ माजी नगरसेवकांची फौज स्वत:सोबत असतानाही शिंदे युतीसाठी अनुकूल दिसतात. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वन मंत्री गणेश नाईक यांची ताकद असलेल्या कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ही शहरे सध्या युतीच्या मार्गातील प्रमुख अडथळे ठरू लागले आहेत. नगरपालिका निवडणुकांची धामधूम संपताच शिंदे-भाजपचे नेते एका व्यासपिठावर दिसू लागले असले तरी वाद मिटले, मनोमिलन झाले असे म्हणणे अजूनही घाईचे ठरेल. शिवाय युती झालीच तरी हे दोन पक्ष एकमेकांच्या पायात पाय घालणार नाहीत असेही म्हणता येणार नाही.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या पायाभरणी सोहळ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे, रविंद्र चव्हाण हे दोन नेते एकाच व्यासपिठावर पहायला मिळाले. नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना चव्हाणांनी संपूर्ण कोकण पट्टीत शिंदे यांच्या शिवसेनेला अंगावर घेतल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे याच काळात कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांमधील शिंदे यांच्या समर्थक नेत्यांना एकामागोमाग एक गळाला लावत चव्हाण यांनी युतीत खळबळ उडवून दिली.

त्यापैकी श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दीपेश म्हात्रे भाजपप्रवेश शिंदे यांच्यासाठी सर्वात धक्कादायक होता. त्यांनी ही अस्वस्थता दिल्लीदरबारी जाऊन उघड केली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे शिलेदार गळाला लावायचे नाहीत, असे ठरवण्यात आले. मात्र, त्यानंतरही शिंदेंच्या पक्षातून भाजपमध्ये जावक सुरूच राहिली. गेल्या आठवड्यात तर सकाळी शिंदे गटातून भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्याच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद संपते नतोच काही तासांत कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत यांना भाजपमध्ये दाखल करून घेण्यात आले. या मुद्यावरच जोरात संघर्ष उद्भवला. आता याच मुद्द्यावर भाजपने नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार अभिजित यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. परंतु, त्यातून नेमके काय साध्य होणार, हा प्रश्न उरतोच.

संघर्ष अटळ

मागील निवडणुकांमधील आकड्यांचा संदर्भ पाहीला तर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सद्यस्थितीत शिंदे यांच्याकडे ६४ नगरसेवकांची फौज आहे, तर भाजपकडे ५२ माजी नगरसेवक आहेत. हे आकडे पाहिले तर या महापालिकेचा राजकीय परीघ या दोन पक्षांनीच व्यापल्याचे पहायला मिळते. शिंदेसेनेचे बरेच नगरसेवक गळाला लावल्यानंतरही भाजपचा आकडा अजूनही या पक्षापेक्षा तसा मागेच आहे. त्यामुळे या शहरात शिंदेसेनेची संघर्षाची वेळ आलीच तर तो सोपा नाही याची पूर्ण कल्पना चव्हाण यांना आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून त्यांचे आक्रमक राजकारण पहाता चव्हाणांना शिंदे यांच्याबरोबर दोन हात करायचे आहेत असेच या भागातील जाणकार सांगतात.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ मध्ये या शहरात भाजप आणि त्यावेळी एकसंघ शिवसेनेत अशी निकराची लढाई पहायला मिळाली होती. तेव्हा शिंदे उपमुख्यमंत्री नव्हते आणि मुख्यमंत्री पदाची ताकदही त्यांनी अनुभवली नव्हती. तरीही शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर त्यांनी भाजपचा दणकून पराभव केला होता. यावेळी या दोन पक्षात युती झाली नाही तर कदाचित २०१५ पेक्षाही निकराची लढाई या दोन पक्षांत पहायला मिळेल. शिंदे यांना अपेक्षित असलेली युती झाली तरीही बहुसंख्य प्रभागांमध्ये शिंदे-चव्हाण संघर्ष होणारच नाही असेही सांगता येत नाही.

चव्हाणांचा बोलविता धनी कोण ?

एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद होते तेव्हा ठाणेच नव्हे तर कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या भाजपचा प्रभाव असलेल्या शहरांवरही शिंदेसेनेने वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केल्याचे चित्र होते. कल्याण डोंबिवली ही शहरे तर शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या अधिपत्याखाली होती. या भागात सुरू असलेल्या जवळपास सगळ्याच लहान-मोठया प्रकल्पांवर डाॅ.शिंदे यांचा अंकुश होता. त्यामुळे राज्याचे सार्वजनिक मंत्री असूनही रविंद्र चव्हाण आपल्याच मतदारसंघात ‘उपरे’ ठरतात की काय अशी परिस्थिती होती. या काळात शिंदे आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर अनेकदा संघर्ष पहायला मिळाला. हा संघर्ष इतका टोकदार बनला होता की काही वेळा डाॅ.श्रीकांत यांना मदत करायची नाही असे ठराव भाजपच्या डोंबिवली शाखेने केले होते.

विधानसभा निवडणुकांच्या ऐन हंगामात रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीत त्यांच्याविरोधात दिपेश म्हात्रे उभे ठाकले. त्यासाठी त्यांनी शिंदे सेनेला जय महाराष्ट्र केला. डाॅ.श्रीकांत यांचे निकटवर्तीय असलेले दिपेश यांनी अचानक ‘मातोश्री’ कशी गाठली असा प्रश्न तेव्हा भल्याभल्यांना पडला. हा घटनाक्रम लक्षात घेतला तर शिंदे आणि चव्हाणांमधील स्थानिक पातळीवरील संघर्ष लपून राहीलेला नाही. भाजपसारख्या बलाढ्य संघटनेचे अध्यक्षपद, त्यापूर्वी मंत्रिमंडळात मोक्याचे स्थान, डोंबिवलीसारख्या मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार असूनही स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेत सतत दुय्यम स्थानावर बसणे हे चव्हाण यांना अलिकडे अधिक अस्वस्थ करत असावे. २०१४ पासूनच ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांच्या कार्यकाळात चव्हाण यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

ठाणे, डोंबिवलीचा अपवाद, चव्हाण पालघरसह संपूर्ण कोकण पट्टीत प्रशासकीय आणि संघटनात्मक पातळीवरही सक्रिय राहीले. नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेले तळ कोकण असो वा वन मंत्री गणेश नाईक यांची नवी मुंबई. येथेही चव्हाण यांनी आपले समर्थक पेरले आहेत. अर्थात परपक्षीय असोत की स्वकीय चव्हाण यांना देवेंद्र फडणवीसांकडून बळ मिळते हे काही लपून राहीलेले नाही. अगदी शिंदे यांच्या ठाण्यातील काही माजी नगरसेवक, प्रभावी नेत्यांना फडणवीस यांच्यापर्यत पोहचण्यासाठी चव्हाण याच मार्गाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे ठाणे, कोकणात शिंदेसेनेला डिवचताना चव्हाण यांचा बोलविता धनी कोण हेही लपून रहात नाही.

तुम मुझे कबतक रोकोगे…..

डाॅ.श्रीकांत शिंदे हे अलिकडच्या काळात चव्हाण आणि शिंदे यांच्यातील वादाचा केंद्रबिंदू राहीले आहेत. एक काळ असा होता जेव्हा एकनाथ शिंदे आणि चव्हाण यांच्या मैत्रीचे दाखले दिले जायचे. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे राजकारण करताना थोरल्या शिंदेनी कधीही चव्हाणांना दुखावले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चव्हाणांना विश्वासात घेऊनच राजकारण केले जाई. डाॅ.श्रीकांत खासदार झाल्यापासून मात्र हे समीकरण बिघडत गेले. कल्याण लोकसभा मतदारसंघात डाॅक्टर नावाने प्रचलित असलेले श्रीकांत कमालीचे महत्वकांक्षी. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते येताच कल्याण मतदारसंघ ‘शत प्रतिशत शिवसेना’ करण्याचा चंगच जणू त्यांनी बांधलेला दिसतोय. त्यामुळे मित्रपक्षातील चव्हाण असोत अथवा शिंदे यांचे कधीकाळच्या समन्वयी राजकारणाचे मोठे उदाहरण ठरलेले जितेंद्र अव्हाड, डाॅ.श्रीकांत शिंदे सर्वांनाच अंगावर घेताना दिसतात.

नगरविकास विभागामार्फत हजारो कोटी रुपयांचा निधी त्यांनी मतदारसंघात आणायला सुरुवात केली तेव्हापासून हा संघर्ष वाढतोच आहे. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमआयडीसीचे प्रकल्प, पैसा कल्याणात धोधाे वाहत असतान केंद्रस्थानी डाॅ.श्रीकांत हेच दिसतात. यातूनच चव्हाण, मनसेचे राजू पाटील, जितेंद्र आव्हाड, गणपत गायकवाड सर्वांचेच त्यांच्याशी जमेनासे झाले आहे. एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत. शनिवारी डोंबिवली येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात याची प्रचिती आलीच.

थोरले शिंदे आणि रविंद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर असल्याने महायुतीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली. मात्र शिंदेपुत्राच्या मनात काही वेगळेच असावे. ‘ मुठ्ठी मैं कूछ सपने लेकर..जेबो मैं भरकर आशाए. दिल मैं है अरमान यही की कुछ कर जाए. सूरज सा तेज नही मुझमे. लेकीन दीपक सा जलता देखो गे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे’ ही आर.डी.तैलंग यांची कविता सादर करत श्रीकांत यांनी चव्हाणांवर तोंडसुख घेतल्याची आता चर्चा आहे. युती झालीच तरी शिंदे-चव्हाणांचे मनोमिलन शक्य आहे का हा प्रश्न म्हणूनच मागे उरतोच.