ठाणे : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले होते. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले पाहा.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. याच दरम्यान, दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले होते. याविषयी एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढे चाललो आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनतेने शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह, बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळातही आमचा विजयाचा झेंडा कायम राहील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दानवे यांच्या वक्तव्याविषयी शिंदे यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळल्याचे दिसते.

ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी आणि महायुतीमधील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव,आमदार कुमार आयलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी रिपाइंचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रविंद्र फाटक यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. रविंद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. संबंधित मतदारसंघांमध्ये महायुतीचे प्राबल्य असून बहुमतही महायुतीकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरही भाष्य केले. ठाणे-पालघरपुरतेच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.

महायुतीमधील काही ठिकाणच्या बंडखोरीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ तारखेपर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील, ते माघार घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.