ठाणे: इराण – इस्रायल – अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्र काही काळासाठी बंद झाल्याने यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.

दुबई व परिसरात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत स्वतः संवाद साधत शिंदे यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय ठेवला. त्यानुसार आज दुपारी फुजैरा विमानतळ येथून स्टार एअर ची दोन विशेष विमाने मुंबईकडे उड्डाण करणार आहेत. यामध्ये व्हीटी-जीएसओ – दुपारी ३.३० वाजता एक उड्डाण तर व्हीटी-जीएसएच – दुपारी ४.३० वाजता उड्डाण करणार आहे. या दोन्ही विमानांद्वारे एकूण १६४ प्रवासी संध्याकाळी ५.३० ते ७.०० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दाखल होणार आहेत. या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आणि इतर भागांतील नागरिकांचा समावेश आहे.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला होता. “काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने विविध मंत्रालये, संबंधित अधिकारी आणि विमान कंपनीशी अखंड संपर्क ठेवून या १६४ प्रवाशांच्या परतीचा मार्ग मोकळा करण्यात आला.या तातडीच्या आणि समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे १६४ मराठी बांधवांचा सुरक्षित प्रवास शक्य होत आहे.