ठाणे : ‘क्रिकेट है तो विकेट है… आम्ही सुद्धा २०२२ मध्ये अशीच एक मोठी विकेट काढली होती, ती आजही अनेकांच्या लक्षात आहे. आज सुद्धा त्यातले काही जण माझ्यासमोर बॅटिंग करायला येतात. पण लगेच क्लीन बोल्ड होतात. कारण माझी फिल्डींग टाईट आहे’. असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे प्रेसिडेंट कप – २०२६ या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेते सलमान खान ही उपस्थित होते. ठाण्याला अनेक वर्षांनी आलो मात्र ठाणे आता वांद्रे पेक्षा अधिक चांगल दिसू लागलं आहे. असे यावेळी सलमान खान यांनी मत व्यक्त केले.
टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India – 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ गुरुवार ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैदानात हजारो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
टेनिस क्रिकेटपटूना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून तीन वेळा आयोजित केली जाईल अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आयटीसीएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचे कौतुक केले. तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासाठी आजवर ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
तर यावेळी अनेक वर्षानी आपण ठाण्यात आलो आहोत. ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटले. आज ठाणे हे वांद्रे पेक्षा ही अधिक उत्तम दिसू लागले असल्याचे अभिनेते सलमान खान यांनी सांगितले.
टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे. आर्थिक दृष्टया देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावे आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच हेतून स्पर्धेची विजेती रक्कम देखील १ कोटी करण्यात आली असल्याचे ही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल किंग्स हा पहिला सामना पार पडला.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.
