ठाणे – दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने दोन विशेष विमाने पाठवली असून सायंकाळपर्यंत सर्व सुरक्षित मुंबईत परततील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. धुलीवंदनाच्या निमित्ताने बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत ही माहिती जाहीर केली.

धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले की, सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण होवो, अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. बळीराजा शेतकरी, कामगार, कष्टकरी, लाडक्या बहिणी-भावांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची बरसात व्हावी, हीच भावना असल्याचे त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाऊन वंदन करताना ठाणे हे ‘उत्सवांची पंढरी’ असल्याचे ते म्हणाले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोविंदा, होळी, धुलीवंदन यांसारख्या सणांची परंपरा ठाण्यात रुजवून ती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचे कार्य आनंद दिघे यांनी केले, असे त्यांनी नमूद केले.

दरवर्षी हे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात; मात्र यंदाच्या होळी-धुलीवंदन सणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचे सावट आहे. तसेच शिवसेनेच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातही दुःखद घटना घडल्याने यंदा जल्लोष टाळून परंपरा जपण्यावर भर देण्यात येत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. संस्कृती जपत साधेपणाने सण साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

धुलीवंदन आणि रंगपंचमी साजरी करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. केमिकल मिश्रित रंगांचा वापर टाळण्यासंदर्भात सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, रासायनिक रंगांचा वापर लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी गेल्या दोन दिवसांत संपर्क साधून मदतीची विनंती केल्याची माहिती देताना शिंदे म्हणाले की, संबंधितांशी दूरध्वनीवर संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला. दुबईतील डॉक्टर संजीव पैठणकर, महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी तसेच युवा सेनेचे राहुल कनाल हे तेथील पर्यटक व विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात होते. अचानक विमान सेवा रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने दोन विशेष विमाने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असून संबंधित प्रवासी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

पुणे, ठाणे, मुरबाड, शहापूर, अहिल्यानगर, मुंबई आदी ठिकाणांतील सुमारे १६४ पर्यटक आणि नागरिकांचा यात समावेश आहे. सर्वांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे काम सुरू असून राज्य शासनानेही आवश्यक ते नियोजन केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. दुबईतील हॉटेल मालकांशीही संपर्क साधून नागरिकांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.