डोंबिवली- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर डोंबिवली, कल्याणमधील शिवसैनिकांनी मंगळवार पासून गुपचिळी धरली होती. बुधवारी दुपारपासून शिंदे समर्थकांनी ‘तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ अशा आशयाचे फलक लावल्याने डोंबिवली, कल्याणमधील मोठा गट शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी सकाळी शिंदे यांनी बंडखोरी केल्याचे जाहीर होताच, कल्याण, डोंबिवलीतील शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ, जबाबदार पदाधिकारी यांना माध्यमांशी एकही शब्द न बोलण्याचे वरून आदेश आले होते. अनेक निष्ठवान शिवसैनिक, जबाबदारी पदाधिकारी यांना संपर्क करुनही ते शिंदे यांच्या बंडखोरी विषयी एक शब्दही बोलत नव्हते आणि मोबाईलवर संपर्क केल्यावर त्यास प्रतिसाद देत नव्हते.

त्यामुळे डोंबिवली, कल्याणमधील शिवसैनिक शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे की शिंदे यांच्या बरोबर जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मंगळवारी दुपार पासून शिवसेना डोंबिवली उपजिल्हाप्रमुख आणि खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे उजवे मानले जाणारे राजेश कदम यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे फलक डोंबिवली शहराच्या विविध भागात लावले आहेत. हे फलक वाचण्यासाठी गर्दी जमत आहे.

फलकावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे स्मरण करून फलकावरील मजकूर लिहिण्यात आला आहे. बंडखोरी केली असली तरी शिवसेनाप्रमुख, जिल्हाप्रमुख दिघे यांच्या शिकवण, संस्कार आणि विचारातून वाटचाल करणार असल्याचा संदेश फलकावर देण्यात आला आहे.

या फलकबाजीमुळे आता खरी शिवसेना कोणती. उध्दव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची असे प्रश्न फलक वाचताना पादचारी एकमेकांना विचारताना दिसत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde shivsena support dombivali banner dombivali kalyan amy
First published on: 22-06-2022 at 18:10 IST