ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमात येऊन शिवसेना दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावतात आणि त्यानंतर पक्षातील सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी करतात. परंतु यंदा त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावले खरे पण, सहकाऱ्यांसोबत त्यांनी धुळवड साजरी केली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन आणि कार्यकर्त्यांच्या घरांत झालेल्या निधनाच्या दुखद घटना यामुळे धुळवड साजरी करणार नसल्याचे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर नवरात्रोत्वस, धुळवड यासह इतर सण-उत्सव सुरू केले. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा पुढे सुरूच ठेवली आहे. धुळवडीच्या दिवशी मंत्री शिंदे हे टेंभीनाक्यावर जातात आणि तिथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावतात आणि त्यानंतर पक्षातील सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी करतात. यंदाही ते टेंभी नाका येथील आनंदआश्रमात गेले. प्रथेनुसार त्यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमांना अभिवादन केले आणि त्यांच्या प्रतिमांना विविध रंग लावून धुळवडीची परंपरा जपली. यानंतर मात्र, सहकाऱ्यांसोबत त्यांनी धुळवड साजरी केली नाही. टेंभी नाक्यावर येण्यापुर्वीच त्यांनी तसे संदेश कार्यकर्त्यांना धाडले होते.

एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्यावर पत्रकारांशी संवाद साधत धुळवड साजरी न करण्यामागेचे कारण स्पष्ट केले. नागरिकांची इडीपिडा टळो, राज्यावरची आणि देशावरची सर्व संकटे जळून खाक होवोत, अशा प्रकारची प्रार्थना होलिका देवीजवळ काल केली. आज, मंगळवारी धुलीवंदन आहे. त्यानिमित्त जनतेला मनापासून धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धी, आनंदाचे आणि आरोग्याचे दिवस येवोत. राज्यातील जनतेच्या जीवनात सप्तरंगाची उधळण होवो आणि आनंदाची बरसात होवो, अशा शुभेच्छा देतो, असे शिंदे म्हणाले. यावर्षीची होळी आणि धुलीवंदन यावर अजित पवार यांच्या निधनाचे सावट, दुखाची किनार आणि आमच्या शिवसेनेच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या घरात देखील दुखद निधन झाले म्हणून हे दुख कार्यकर्त्यांच्या घरातील म्हणजे आमच्या परिवारातले आहे. त्यामुळे धुळवड साजरी करत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही धुलीवंदन दरवर्षी उत्साहात साजरी करतो. यंदा उत्साहात, जल्लोषा करण्याऐवजी परंपरा जोपण्याचे काम शिवसेना करीत आहे. परंपरेनुसार, आनंदाश्रमात आनंद दिघे आणि बाळासाहेबांना वंदन केले, त्यांनाही विविध रंग लावून परंपरा जोपसली. येथे हजारो कार्यकर्ते येतात आणि प्रत्येक सण साजरा करतात. आनंद दिघेंनी ठाण्यात सर्व सण, गणपत्ती, नवरात्रो, दहिहंडी, होळी, धुलीवंदन हे सर्व सण सुरू केले. ठाण्याची परंपरा राज्यात पसरविण्याचे काम केले. ठाणे ही उत्सवाची आणि गोविंदा आणि सर्व सणांची पंढरी म्हणून ओळखतो. पर्यावरण पुरक होळी साजरी करावी, याचे आवाहन आधीच केले. अशी होळी साजरी करून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. राज्य शासनाकडून करण्यात येणाऱ्या आवाहनाला जनता प्रतिसाद देत आहे. केमिकल मिश्रीत रंगांचा वापर कमी झालाय, नैसर्गिक रंगांचा वापर जास्त करत आहेत, असे शिंदे म्हणाले.