ठाणे : विकासकामांचे श्रेय घेण्याच्या वादात आम्ही पडत नाही. कोणत्याही भागाच्या विकासकामांमध्ये कधीही दुजाभाव केला नाही. आम्हाला श्रेयाशी नाही, तर कामाशी संबंध आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे ठाणे महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित ठाणे गौरव, ठाणे भूषण, ठाणे गुणिजन आणि विशेष पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या ठाणेकरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
ठाणे महापालिका गेल्या ४४ वर्षांपासून शहराच्या विकासासाठी कार्यरत आहे. ठाण्याच्या विकासाचा इतिहास सांगताना आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, असे शिंदे म्हणाले. शिवसेनेला पहिली सत्ता ठाणे शहराने दिली आणि त्यानंतर राज्यातील इतर भागांतही पक्षाला सत्ता मिळत गेली, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेची भूमिका आता केवळ गटार, मीटर आणि पाण्याच्या प्रश्नांपुरती मर्यादित राहिलेली नाही. शहराचा सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे. समाजासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारे असे कार्यक्रम काळाची गरज आहेत. अशा पुरस्कारांमुळे समाजासाठी आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे शिंदे यांनी सांगितले.
ठाणे शहरात सध्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. रिंग मेट्रो, विविध मेट्रो प्रकल्प, ठाणे-बोरिवली बोगदा तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोड यांसारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या वाहतुकीचे चित्र बदलत आहे. ठाणे आज खऱ्या अर्थाने बदलत असून साहित्यिक, कलावंत आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरही ठाण्यात वास्तव्यास प्राधान्य देत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
‘नो रिझन, जागेवर डिसिजन’ या भूमिकेवर भर देताना शिंदे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचे आवाहन केले. नियमांच्या चौकटीत काम कसे करता येईल, याचा विचार करून नागरिकांची कामे मार्गी लावली पाहिजेत. कारणे सांगत कामे प्रलंबित ठेवण्यापेक्षा निर्णय घेऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात आले. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण एक टीम म्हणून काम करत असून विकासाच्या बाबतीत समन्वयाने निर्णय घेतले जात आहेत, असेही शिंदे म्हणाले.
ठाण्यात सुरू झालेल्या अनेक विकासकामांची व्याप्ती पुढे राज्यभर वाढली. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पामुळे ठाण्यात नियोजित पद्धतीने उंच इमारती आणि टाऊनशिप उभ्या राहत असून नागरिकांना चांगली घरे उपलब्ध होत आहेत. ‘सिटी विथिन सिटी’ या संकल्पनेचे उत्तम उदाहरण ठाण्यात पाहायला मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
रिंग मेट्रोबरोबरच मेट्रोची व्याप्ती कळवा-मुंब्रा भागातही वाढत आहे. या कामांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या कामांच्या श्रेयवादात न पडता विकासकामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. ‘आम्हाला फक्त काम करायचे आहे; कामामध्ये श्रेयवाद नको,’ अशी भूमिका शिंदे यांनी स्पष्ट केली.
ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे झाली असून कळवा-मुंब्रा भागातही विकासकामांना निधी देताना कोणताही राजकीय दुजाभाव केला नाही. कोणत्या मतदारसंघात कोणाचा लोकप्रतिनिधी आहे, याचा विचार न करता विकासकामांना प्राधान्य दिले. विकासकामांच्या फाइल्स असोत किंवा इतर विकासाशी संबंधित प्रस्ताव, कामे तातडीने मार्गी लावण्यावर आपला भर असतो, असेही त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाची दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांनीही समन्वयाने आणि एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कामावर नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे नागरिकांना अपेक्षित असलेली कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उत्सव साधेपणाने, अन्नदात्याला मदतीचा हात
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव आणि आगामी सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. उत्सवावरील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन बचत झालेला निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. “अन्नदाता संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सेवा आहे,” असा संदेश त्यांनी दिला. तसेच सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
