अंबरनाथ: बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरोधात रविवारी अंबरनाथमध्ये फलक लावण्यात आले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि डॉ. किणीकर यांच्या समर्थनासाठी शिंदे समर्थक शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजी चौकात हे शक्तिप्रदर्शन होणार असल्याची माहिती एका शिंदे समर्थक गटाच्या नगरसेवकाने दिली आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या बंडखोरीला अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही पाठिंबा दिला. डॉ. किणीकर सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येतो. दोनच दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर शहरात असलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी अंबरनाथ शहरात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या डॉ. किणीकर यांच्याविरुद्ध फलकबाजी करण्यात आली होती. त्यामुळे उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात शिंदे यांच्या बंडाला विरोध असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

त्याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये आता एकनाथ शिंदे गट आणि डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमण्याचे आवाहन शिंदे समर्थक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. अंबरनाथ शहरात विकासाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अनेक प्रकल्प मंजूर केले. कोट्यवधींचा निधी अंबरनाथ शहराला दिला. अंबरनाथ शहराचा विकास वेगळ्या दृष्टीने केला जातो आहे. अंबरनाथ शहर ठाणे शहराची स्पर्धा करत असल्याचे वक्तव्य अनेकदा एकनाथ शिंदे यांनी केले होते. तर एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंबरनाथ शहरात आहेत. अशा वेळी एकनाथ शिंदे आणि डॉ. बालाजी किणीकर यांना पाठिंबा देण्यासाठी किती संख्येने समर्थक जमतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.