शिंदे समर्थकांचा जल्लोष ; ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्री पद मिळाल्याने नागरिकांतूनही समाधान

पारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे हे घेतील असे जाहीर केले.    

शिंदे समर्थकांचा जल्लोष ; ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्री पद मिळाल्याने नागरिकांतूनही समाधान
पाऊस सुरू असतानाही शिंदे समर्थकांचा जल्लोष सुरू होता.

ठाणे : शिवसेनेतील बंडाचे नेते असलेले एकनाथ शिंदे यांची अचानकपणे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने ठाणे जिल्ह्यात गुरुवारी जल्लोषाचे वातावरण होते. पत्रकार परिषदेत शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच ठाण्यातील लुईसवाडी भागातील निवासस्थान परिसरात शिंदे समर्थकांनी मोठी गर्दी करत फटाक्यांची आतषबाजी केली. विशेष म्हणजे, शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचा एक गट अस्वस्थ होता. त्यातील अनेक जण आता शिंदे गटाकडे खेचले जाण्याची शक्यता आहे.

 राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या काही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे यांचे उघडपणे समर्थन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा मोठा भरणा होता. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे चित्र होते. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित येऊन नवे सरकार स्थापन करतील अशी शक्यता वर्तविली जात होती. या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची तर उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड होईल अशी चर्चा होती. मात्र, दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे हे घेतील असे जाहीर केले.    

या वृत्तानंतर ठाणे जिल्ह्यातील शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. समाजमाध्यमांवर शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांवर सुरू झाला होता. त्यांच्यासोबत असलेले फोटो समर्थकांक़डून समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात होते.

 ठाण्यातील लुईसवाडी भागात शिंदे यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी शिंदे समर्थक जमण्यास सुरुवात झाली होती. काही वेळातच या ठिकाणी शिंदे समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. हातात भगवे झेंडे घेऊन समर्थक थिरकत होते आणि शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते. तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करत होते. पाऊस सुरू असतानाही शिंदे समर्थकांचा जल्लोष सुरू होता. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि जिल्ह्याच्या इतर भागांमध्येही असेच काहीसे चित्र होते. या ठिकाणी चौकांमध्ये जमून समर्थक जल्लोष करीत होते. शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याने गेल्या काही दिवसांपासून काठावर असलेले शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पहिल्या तडाख्यात ठाणे जलमय ; मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले; नालेसफाईबाबतचे पालिकेचे दावे फोल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी