ठाणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांनी किसननगर, ठाणे महापालिकेबाहेर आणि टेंभीनाका येथे फटाके फोडून जल्लोष केला.

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस बजवाण्यात आली होती. तसेच त्यांना सोमवार सायंकाळपर्यंत उत्तर द्यायचे होते. शिंदे यांच्या गटाने या नोटिसला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. हा निकाल शिंदे गटाला दिलासा देणारा ठरला. त्यामुळे शिंदे समर्थकांनी किसननगर येथील शाखा, ठाणे महापालिका प्रवेशद्वार आणि टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर फटाके फोडून तसेच मिठाई वाटप करून जल्लोष केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे देखील सहभागी झाले होते. शिवसेनेला संपविण्यासाठी राष्ट्रवादीने तुघलकी निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मोठी चपराक दिलेली आहे. अशी टिका नरेश म्हस्के यांनी केला आहे. तर, हा विजय सत्याचा आणि हिंदुत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.