ठाणे शहरातील मुख्य महामार्ग व घोडबंदर रस्त्यावर सोमवारी (27 सप्टेंबर) पुन्हा झालेल्या वाहतूककोंडीची थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतलीय. त्यांनी याबाबत वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे आदेश दिले. एकनाथ शिंदे मंगळवारी (28 सप्टेंबर) स्वतः नवी मुंबई, खारेगाव, शहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहाणी करणार आहेत. तसेच सुयोग्य जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग लॉट उभारण्यात येणार आहेत. घोडबंदर रोडवर गायमुख येथे ऑइल टँकर उलटल्यामुळे सोमवारी वाहतूक कोंडी झाल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“वाहतूक कोंडीने नागरिकांवर तासनतास अडकून पडण्याची वेळ”

ठाणे शहरात गेल्या काही दिवसात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, शहरात चालू असलेली विकास कामे यामुळे या वाहतूककोंडीत भर पडत आहे. मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवे पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणे मार्गे पुढे जात होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूककोंडी होऊन त्यात नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत होते. त्यातच सोमवारी मध्यरात्री टँकर उलटल्यामुळे पुन्हा एकदा घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी झाली.

यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने ठाणे पोलीस, वाहतूक पोलीस, ग्रामीण पोलिस, ठाणे महापालिका आदी संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीस ठाणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनय राठोड, मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

“एकनाथ शिंदे स्वतः पार्किंग लॉटची पाहणी करणार”

रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत अवजड वाहने शहराच्या बाहेर पार्किंग लॉट तयार करून तिथे अडवून टप्प्याटप्प्याने पुढे सोडण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार, मंगळवारी या जागांची पाहाणी एकनाथ शिंदे करणार आहेत. 

खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार

जेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील पार्किंग लॉटमध्ये थांबवण्यात येणार आहेत. तसेच, मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डी-सोनाळे-दापोडे येथे नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने आणि अहमदाबाद येथून मुंबईत येणारी वाहने दापचारी येथे थांबवण्यासाठी ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात येईल. यासाठी खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार आहेत.

अवजड वाहने रोखून टप्याटप्याने शहरात सोडणार

या ठिकाणी अवजड वाहने रोखून वाहतूक विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या टप्याटप्याने ही वाहने शहरात सोडण्यात येतील. जेणेकरून वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होईल. पालकमंत्री शिंदे हे स्वतः या नियोजित पार्किंग लॉटच्या जागांची पाहाणी करणार आहेत. त्यानंतर या पार्किंगच्या जागावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हे नियोजन असेल. त्यामुळे ठाणे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत!

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde take emergency meeting of police about traffic jam in thane pbs
First published on: 27-09-2021 at 19:46 IST