ठाणे : देशातील घटनात्मक संस्थांविरोधात आंदोलने करून आणि विविध मुद्द्यांवरून जनतेमध्ये असंतोष निर्माण करून देशात अशांतता व अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांच्या आंदोलनांमागे परकीय शक्तींचा हात किंवा सहभाग दिसत असल्याचा आरोप शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात केला. उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शुक्रवारी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.
सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे काढणे, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणे तसेच दिल्लीत आंदोलने करून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. विरोधक नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेतील परिस्थितीची उदाहरणे देतात, हे कशाचे द्योतक आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनात्मक संस्थांचा अपमान करण्याचे काम विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत असल्याची टीका त्यांनी केली. हातात संविधानाचे पुस्तक घेऊन राहुल गांधी संविधानविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांवर प्रहार केला जात असल्याचे सांगितले. खोट्या कथनांच्या माध्यमातून जनतेला भडकवण्याचा प्रयत्न होत असला, तरी देशातील १४० कोटी जनता अशा कथनांना बळी पडणार नाही. काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी देश तोडण्याची भाषा करण्याऐवजी देश जोडण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि इंडिया आघाडीकडून करण्यात आल्याचा आरोप करत न्यायालयाने त्यांना फटकारल्याचेही ते म्हणाले. परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे जनता पूर्ण होऊ देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशात पक्षविस्ताराला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. दुबे यांच्यासह गुलाबचंद मौर्य, सुनील चौबे, ब्रीजेश मौर्य, दशरथ प्रजापती, प्रवीण दुबे आणि धनंजय गुप्ता यांच्यासह अनेकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस राहुल कनाल आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दुबे यांना शिवसेनेची कार्यपद्धती माहिती असून युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांचा त्यांच्याशी सातत्याने संपर्क होता, असे शिंदे यांनी सांगितले. दुबे यांनी योग्य पक्षात प्रवेश केला असून शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कोणी मालक नसून सर्वजण कार्यकर्ता म्हणून काम करतात, असे ते म्हणाले. दुबे यांनी स्वीकारलेली ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही होती आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तीच भूमिका आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना विविध कल्याणकारी योजना राबविल्या आणि पायाभूत विकास प्रकल्पांना गती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य लाभल्याने महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचे काम करता आले. राज्य आज विविध क्षेत्रांत आघाडीवर असून सरकारच्या कामामुळे प्रभावित होऊन विविध पक्षांतील लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असा दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेशात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी आनंद दुबे आणि त्यांची टीम काम करेल, असेही शिंदे यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार विजयी होतील
विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघात सचिन सानप यांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. सानप हे मूळचे शिवसेनेचे असून या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, असे ते म्हणाले. उर्वरित चार मतदारसंघांत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
