ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी मोदी हटणार नाहीत. मात्र देशातून भ्रष्टाचार आणि दहशतवाद नक्कीच हटेल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. देशातील तरुणाई विरोधकांच्या मागे नव्हे, तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या मागे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाण्यात भाजपच्या वतीने रविवारी लोकतंत्र बचाव पदयात्रा काढण्यात आली, या यात्रेत शिंदे यांनी काँग्रेस, इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधकांकडून विविध संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून खोटे कथानक तयार करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या कथित अपप्रचाराला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गल्लोगल्ली जाऊन उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी जनधन योजना, बेटी बचाओ योजनेसह शेतकरी सन्मान योजनेसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचविला आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. २०२९ ला निवडणूक जिंकण्याचा विचार तर दूरच, पुढील २५ वर्ष निवडून येणार नाहीत. कारण, पुढील २५ वर्षांसाठी आवश्यक असणारे काम मोदी यांनी करून ठेवले आहे, असे शिंदे म्हणाले.
२०१४ पूर्वीचा भारत आणि २०१४ नंतरचा भारत यातील फरक जनतेला समजावून सांगण्याची गरज आहे. दहशतवादाविरोधात मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली असून, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या निर्णय घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात बारा वर्षांत दोन लाख कोटी रुपये देण्यात आले होते, तर मोदी सरकारच्या काळात पंधरा लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला. देशात महामार्ग, विमानतळ आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधकांकडून सातत्याने लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला जातो. मात्र, आंदोलनांना परवानगी मिळत असताना लोकशाही धोक्यात असल्याचा कांगावा कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
