ठाणे : टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर शुक्रवारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताला राखी बांधण्यासाठी राज्यातील विविध भागांतून महिलांनी गर्दी केली होती. या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला.
टेंभीनाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे आनंद आश्रम आहे. या आनंद आश्रमा बाहेर मंच उभारुन तेथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी दुपारी कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर राज्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी त्यांना राखी बांधण्यास सुरुवात केली. राखी बांधण्यासाठी महिलांनी रांगा लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील मार्गिकेवरून एकेरी पद्धतीने वाहतूक सोडली होती. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला.
ठाणे बाजारपेठ, टेंभीनाका, कोर्टनाका, उथळसर या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. या वाहतूक कोंडीत अनेक बसगाड्या देखील अडकून होत्या.
