ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात बिनविरोध उमेदवार निवडून आल्याच्या मुद्द्यावरून गाजलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत १ लाख २० हजार मते ‘नोटा’ ला मिळाली आहेत. चार सदस्य प्रभाग पद्धतीत एका मतदाराला चार मत देण्याचा अधिकार होता. यामुळे ३० हजार ठाणेकरांनी नोटाचा पर्याय निवडून उमेदवारांना नाकारल्याचे चित्र दिसून आले. नोटाला सर्वाधिक मते घोडबंदर येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये तर, सर्वात कमी मते मुंब्रा येथील किसननगर, पडवळनगर येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये मिळाली आहेत.
यंदा ठाणे महापालिका क्षेत्रात १६ लाख ४९ हजार ८६९ इतके मतदार होते. त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ८७८ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० महिला आणि १५९ इतर मतदार होते. या निवडणुकीसाठी ९ प्रभागांमध्ये ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये उभारण्यात आली होती. या निवडणुकीसाठी एकूण ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामुळे १२५ जागांसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत.
ठाणे पालिका निवडणुकीत १६ लाख ४९ हजार ८६९ मतदारांपैकी ९ लाख १७ हजार १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात ४ लाख ८३ हजार ६९८ पुरूष तर, ४ लाख ३३ हजार ३८५ महिला आणि ४० इतरांचा समावेश होता. मागील वर्षीच्या ५८.८ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ५५.५९ टक्के मतदान झाले. ९ लाख १७ हजार १२३ पैकी ३० हजार मतदारांनी १ लाख २० हजार मते नोटाला दिल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रभाग २ मध्ये ६ हजार ७७ तर, सर्वात कमी प्रभाग क्रमांक १८ मध्ये ८३४ मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचे दिसून आले.
नोटाला मिळालेल्या मतांची आकडेवारी
- प्रभाग क्र – नोटा
- १ – ५०६२
- २ – ६०७७
- ३ – २७८३
- ४ – ४५०५
- ५ – ३१६२
- ६ – ४३६४
- ७ – ४५७०
- ८ – ४२३८
- ९ – ४३६२
- १० – ४०६०
- ११ – ४०३९
- १२ – ३६१९
- १३ – ३१४४
- १४ – २८७७
- १५ – ३१०४
- १६ – ४३४५
- १७ – २१६४
- १८ – ८३४
- १९ – ३९९२
- २० – ४१६८
- २१ – ४४८९
- २२ – ४४७५
- २३ – ४७३१
- २४ – ४१५५
- २५ – २२८१
- २६ – ५६५२
- २७ – २७२५
- २८ – २७०५
- २९ – १९१८
- ३० – १३०१
- ३१ – २८१७
- ३२ – ३९३७
- ३३ – १४३६
